आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाविआविरोधात महाआघाडी तयार करण्याच्या हालचाली!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका निवडणूक आरक्षणाची सोडत पार पडताच पुन्हा सत्ताधारी खान्देश विकास आघाडीला रोखण्यासाठी ‘महाआघाडी’ तयार करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. खाविआला थांबविण्यासाठी सर्व विरोधकांची मोट बांधण्याची चाचपणी सुरू झाली आहे. अर्थात सध्याची राजकीय परिस्थिती विचारात घेऊन इतर पक्ष कसा प्रतिसाद देणार, यावर महाआघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.

शहरातील राजकीय स्थिती विचारात घेऊन महिनाभरापूर्वी महानगर विकास आघाडीचे गटनेते नरेंद्र पाटील यांनी खाविआ विरोधात सर्व राजकीय पक्षांना एकत्र आणून महाआघाडी निर्माण करण्याचा विचार व्यक्त केला होता. यावर बराच काळ खलसुद्धा झाला होता. मात्र, इतर राजकीय पक्षांकडून त्यात फारसे गांभीर्याने न घेतल्याने चच्रेला काही काळ ब्रेक लागला होता. आरक्षण सोडतीनंतर राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू झाली आहे. महापालिकेतील भ्रष्टाचार व पालिकेवरील कर्जाचा डोंगर या मुद्याला हात घालत सत्ताधारी खान्देश विकास आघाडीला रोखण्यासाठी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर सर्व पक्षांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. घरकुल घोटाळ्याचे भांडवलही महाआघाडीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. खाविआच्या उमेदवारांविरोधात विविध उमेदवार न देता महाआघाडीचा उमेदवार दिल्यास सत्ता स्थापन करणे शक्य असल्याचे गणित पाटील यांनी मांडले आहे. यातून समोरासमोर लढत होऊन विजय मिळवता येईल, असे सांगितले. यासाठी स्वत: भाजप व राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेणार असल्याचे ‘दिव्य मराठी’शी बोलताना त्यांनी सांगितले. गेल्या निवडणुकीत खान्देश विकास आघाडीला 42 हजार मतदान मिळाले होते. तर त्यांच्या विरोधातील सर्व राजकीय पक्षांना 49 हजार मते मिळाली होती. परंतु मते विखुरली गेल्याने खाविआचे उमेदवार विजयी झाले. एकत्रित लढय़ासाठी लवकरच विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह प्रमुख नेत्यांची भेट घेणार असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.