आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon, Municipal Corporation Election Preparation

सतरा मजलीत ‘एन्ट्री’साठी आंबेडकरी विचारांचे संघटनही एकवटतेय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप व राष्ट्रवादी हे वेगवेगळ्या विचारांचे पक्ष आघाडी करण्याचा विचार करू लागल्यानंतर पालिकेत पाय रोवण्यासाठी आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर कार्य करणार्‍या वेगवेगळ्या संघटनांना एकत्र आणण्याची रणनीती आखली जात आहे. त्यादृष्टीने सर्वांना निरोप देण्यात आले असून येत्या रविवारी सामूहिक बैठक घेण्यात आली आहे.

महापालिका निवडणुकीला अजून दोन महिने असताना त्यापूर्वीची धूळवड उठायला सुरुवात झाली आहे. खान्देश विकास आघाडीला रोखण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस हे परस्पर विरोधी विचारांचे राजकीय पक्ष एकत्र येण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करू लागले आहेत. नेत्यांकडूनही सर्व पर्याय खुले असल्याचे जाहीर केले जातेय. राजकारणात असेही पर्याय पुढे येऊ पाहत असताना बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार व प्रसाराचे कार्य करणार्‍या अनेक संघटनादेखील एकत्र येण्याच्या दृष्टीने विचार करू लागल्या आहेत. आम्ही सर्व जण एकच काम करतो; फक्त ते एकत्रित न येता वेगवेगळ्या मार्गाने करतोय. आम्हीसुद्धा एकत्र आलो तर आमची ताकद वाढेल. त्याचा फायदा उमेदवार जिंकून आणण्यासाठी केला जाऊ शकतो, असे विचार पुढे येऊ लागले आहेत.

दलित मुक्ती मोर्चाचा पुढाकार
दलित मुक्ती मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख राजू मोरे यांनी यासंदर्भात रविवारी आपल्या संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन सर्व रिपब्लिकन पक्ष व संघटना एकत्र आल्यास महापालिकेत नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते असा विचार मांडला. त्याला पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून होकार आला आहे. त्यामुळे येत्या रविवारी एका विचाराच्या सर्व पक्ष व संघटनांना आमंत्रित करून चर्चा केली जाणार आहे.

मंत्रिपदाच्या अस्थैर्याचा तयारीवर परिणाम!
महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची जबाबदारी देण्यात आलेले पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचा राजीनामा घेण्यात आल्याने नव्या मंत्रीमंडळात समावेश असेल किंवा नाही यावरून पक्षात अस्थैर्य निर्माण झाले आहे. त्यांचे मंत्रीपद पालिका निवडणुकीवर प्रभाव टाकणारे असल्याने मंत्रीपद गेल्यास निवडणुकीचे नेतृत्वही जाणार की काय? याबाबत पक्षात चर्चा सुरू झाली आहे. भाजपसोबत महाआघाडी करण्याचे जाहीर करून राष्ट्रवादीने महापालिका निवडणुकीत आघाडी घेतली होती. दरम्यान दोन दिवसांपासूनच्या अस्थैर्यामुळे निवडणुकांची तयारी थांबली आहे.

मनसे अध्यक्षांनी घेतली पदाधिकार्‍यांची बैठक
पालिकेतील पक्षाची सद्य:स्थिती व क्षमता पाहून किती जागा लढवायच्या यासंदर्भात पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकार्‍यांची पहिलीच प्राथमिक बैठक सोमवारी मुंबईतील ‘कृष्णकुंज’मध्ये झाली.
बैठकीस आमदार बाळा नांदगावकर, आमदार प्रवीण दरेकर, जिल्हा संपर्कप्रमुख विनय भोईटे, गजानन राणे, जिल्हाध्यक्ष ललित कोल्हे उपस्थित होते. या बैठकीत शहरातील पक्षसंघटनेची व नवीन प्रभागरचनेनंतरची स्थिती, जातीय समीकरणे व किती जागा लढवण्याची स्थानिक पदाधिकार्‍यांची तयारी आहे, यासंदर्भात चर्चा झाली. तसेच जिल्हा संपर्कप्रमुख व जिल्हाध्यक्षांनी शहरातील संघटनात्मक स्थितीचा आढावा सादर केला. जळगावच्या मतदारांना बदल हवा आहे व त्यादृष्टीने मनसेकडे पाहिले जात असून, सार्वत्रिक निवडणुकीत चांगला प्रतिसाद मिळण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. याबाबत पदाधिकार्‍यांकडून माहिती जाणून घेतल्यावर राज ठाकरे यांनी प्रभागरचना व इतर काही मुद्यांवर सविस्तर माहितीसह संबंधितांना मंगळवारी पुन्हा बोलावले आहे.
आज पुन्हा बैठक
पालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावलेल्या प्रमुख पदाधिकार्‍यांच्या या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. तसेच मंगळवारी पुन्हा ठरावीक पदाधिकार्‍यांची बैठक घेण्यात येणार असून, या बैठकीनंतर निवडणूकसंदर्भातील पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे. ललित कोल्हे, जिल्हाध्यक्ष, मनसे

चार हरकती
वॉर्डरचनेतील काही भाग वगळण्यात यावा, तसेच काही ठिकाणचा भाग जोडावा अशा आशयाच्या चार हरकती सोमवारी दाखल झाल्या. वॉर्ड 25 मधून शाम मराठे, राहुल नेतलेकर तर वॉर्ड 34 मधून सुरेंद्र कोल्हे, नितीन गायकवाड यांनी हरकती दाखल केल्या आहेत.
खडसेंच्या आगमनानंतरच हालचाली
महापालिकेत आमदार सुरेश जैन यांच्या आघाडीला रोखण्यासाठी तयार करण्यात येणार्‍या महाआघाडीसंदर्भातील विषय तळ्यातमळ्यात असल्याने कार्यकर्तेही बुचकळ्यात पडले आहेत. त्यात आघाडीचा पर्याय खुला असल्याचे जाहीर करत त्याबाबतच्या वृत्ताला हवा देणारे राज्याचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानिमित्त गोवा येथे गेल्याने सध्या चर्चा थांबली होती. तर भाजपचे नगरसेवकही काय निर्णय होतो याबाबत स्पष्ट बोलायला तयार नाहीत. आघाडीबाबत नगरसेवकांकडूनही वेगवेगळी मते मांडली जात आहेत. आघाडीसाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर करण्यात आला असला तरी त्याबाबतचा अंतिम निर्णय एकनाथ खडसे हेच घेतील, असे भाजपतून सांगितले जात आहे. खडसे गोवा येथून परतले आहेत. बाहेर गावाहून दोन दिवसांनी म्हणजे 12 जूननंतर परतल्यानंतर पालिका निवडणुकीसाठी भाजपची पुढील दिशा ठरेल, असेही सांगितले जात आहे.
खडसेंनी जाणून घेतली माहिती
गोवा येथील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतून परतलेले विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे हे सोमवारी जळगावात आले होते. त्यावेळी त्यांना भेटलेल्या नगरसेवक अशोक लाडवंजारी यांच्याकडून त्यांनी त्यांच्या वॉर्डाविषयीची माहिती जाणून घेतली. नवीन प्रभागातील जातीनिहाय लोकसंख्या, प्रभागाची रचना कशी आहे? याची माहिती विचारली. खडसे भेटीस येणार्‍या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची मतेही जाणून घेत असल्याचे सांगितले जात आहे.

भारिपबहुजन महासंघाची बैठक
खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या भारिपबहुजन महासंघाला भाजप राष्ट्रवादीच्या महाआघाडीत समाविष्ट होण्यासंदर्भात बोलावणे आल्याचे जिल्हाध्यक्ष मुकुंद नन्नवरे यांनी सांगितले. मात्र पक्षाचे प्रमुख असलेल्या आंबेडकर यांच्याशी चर्चेनंतर निर्णय घेतला जाणार आहे. भ्रष्टाचार करणार्‍यांच्या मागे उभे राहायचे नाही असे धोरण आहे. पालकमंत्री गुलाबराव देवकरदेखील घरकुल घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. मग त्यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत सहभागी व्हायचे काय? असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये आहे. यासंदर्भात नेते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष नन्नवरे यांनी सांगितले.

नन्नवरे यांचा कल आंबेडकरी संघटनांकडे
भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद नन्नवरे यांनी आंबेडकरी विचारांच्या भारिप बहुजन महासंघ, आठवले गट, दलित मुक्ती सेना, दलित संघर्ष समिती या संघटनांनी एकत्रित येऊन लढल्यास आपणही सोबत जाऊ शकतो असे सांगितले. यासंदर्भात बैठकीसाठी आम्हालाही बोलावण्यात आले आहे. बैठकीत काय चर्चा होते हे पाहून निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.