आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Employee Promotion Issue

जळगाव महापालिका: पदोन्नत्यांचा तिढा लवकरच सुटणार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेतील पदोन्नत्यांचा घोळ दोन वर्षांपासून मार्गी लागलेला नाही. पदोन्नत्यांना पात्र असताना निव्वळ अंतर्गत वादामुळे निवृत्ती काळ जवळ आलेल्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ‘मला ना तुला’ अशा मानसिकतेत असलेल्यांचे मन वळवून खेकडा वृत्तीला आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. पदोन्नती यादीत असलेल्यांचे एकत्रीकरण झाल्यानंतर सर्वांचे आदेश पारित होण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

महापालिकेत सक्षम अधिकारी येत नसल्याने कर्मचार्‍यांच्या पदोन्नत्यांच्या विषयाकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. वर्षभरापूर्वी कर्मचार्‍यांनी पाठपुरावा केल्याने तांत्रिक बाबींची पूर्तता करत पदोन्नत्या देण्यासंदर्भात तत्कालीन आयुक्त प्रकाश बोखड यांनी 20 जानेवारी 2012 रोजी विभागीय पदोन्नती समितीची बैठक घेतली होती. यात 47 कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा केला होता. मात्र, सेवाज्येष्ठतेचा मुद्दा प्रतिष्ठेचा करीत अंतर्गत कुरघोड्यांमुळे सर्वांच्या पदोन्नत्या खोळंबल्या होत्या. हाच प्रत्यय वर्षभरानंतर आला. जिल्हाधिकार्‍यांनी पदोन्नत्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची तयारी दर्शवली असताना पुन्हा गटबाजीने डोके वर काढल्याने एकाचेही काम झाले नाही. या संपूर्ण प्रकरणानंतर एकमेकांचे पाय ओढण्यात आघाडीवर असलेल्यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याबाबत नुकतीच बैठक झाली.

विविध अधिकार्‍यांची 23 पदे अद्यापही रिक्त
महापालिकेतील सहायक आयुक्त, प्रशासन अधिकारी, नगरसचिव, कामगार कल्याण अधिकारी, मिळकत व्यवस्थापक, प्रमुख लेखापाल, बांधकाम विभाग कार्यालय अधीक्षक, प्रशासकीय इमारत कार्यालय अधीक्षक, फेरआकारणी अधिकारी, विधी शाखाप्रमुख, सहायक मिळकत व्यवस्थापक, पाणीपुरवठा उपलेखापाल, स्थायी समिती सचिव, अर्थविभाग उपलेखापाल, सहायक कर अधीक्षक, सहायक जकात अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम उपलेखापाल, कार्यकारी कर अधीक्षक, भांडारपाल, आस्थापना अधीक्षक, वैद्यकीय अधीक्षक, वरिष्ठ जकात निरीक्षक अशा 23 प्रमुख पदांवर अधिकारी नाहीत.

नाराजांना एकत्र करण्याचा प्रयत्न
पदोन्नती प्रक्रिया दोन वर्षांपासून रखडली आहे. अधिकार्‍यांनी पदोन्नत्यांना मान्यता देण्याची तयारी दर्शविली तरी नाराज झालेल्यांकडून इतरांच्या पदोन्नत्यांना विरोध झाल्याने ही प्रक्रिया खोळंबली आहे. अंतर्गत वाद मिटवून सर्वांचे हित जोपासले जाणे गरजेचे आहे. यासाठी नाराज झालेल्यांना समजावून एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. उदय पाटील, प्रभाग अधिकारी