जळगाव- पालिकेतील अधिकार्यांना स्वेच्छा निवृत्तीचे वेध लागले आहेत. विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरलेल्या जळगाव महापालिकेत दोन वर्षात दोन अधिकार्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली असून अजून दोघांनी स्वेच्छा निवृत्तीबाबत नोटीस दिल्या आहेत. ज्यांच्याकडे महत्त्वपूर्ण विभागांचा पदभार आहे, त्यांनीच स्वेच्छा निवृत्ती घेतल्यास पुढे करणार कसे, अशी धास्ती प्रशासनाला वाटू लागली आहे.
वर्षभरापूर्वी वाहन विभागातील अभियंते आर.आर. पांडे यांनी या सर्व कटकटींना कंटाळून वैयक्तिक कारण पुढे करीत स्वेच्छा निवृत्ती घेणे पसंत केले. त्यांच्यापाठोपाठ नगररचना विभागातील आरेखक पी. ई. पाटील यांनी वैयक्तिक कारण पुढे करीत स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे. विधी शाखा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत असलेल्या दामोदर मोरे यांनीही दोन-अडीच महिन्यांपूर्वी वैयक्तिक कारण पुढे करीत आस्थापना विभागाला स्वेच्छा निवृत्तीची नोटीस दिली आहे. 14 जानेवारीला त्यांना सेवेतून मुक्त करावे लागणार आहे. प्रभाग अधिकारी डी. डी. तायडे यांनीही स्वेच्छा निवृत्तीची नोटीस प्रशासनाला दिली आहे. अजून काही अधिकारी स्वेच्छा निवृत्तीच्या मानसिकतेत असून वरिष्ठांजवळ त्यांनी हे विषय बोलूनही दाखविले आहेत. पालिकेतील अधिकारी स्वेच्छा निवृत्तीच्या मानसिकतेत असल्याने प्रशासनातील वरिष्ठांच्या मनात धडकी भरली आहे.