आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता घरबसल्या बनवून घेता येईल मतदार ओळखपत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- आता मतदार म्हणून पात्र असलेल्या मतदारांना मतदान ओळखपत्र मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये रांगा लावण्याची गरज उरणार नाही. घरबसल्या फोनवरून 24 तासात मतदान ओळखपत्र बनविण्याचा उपक्रम निवडणूक आयोगाने सुरू केला आहे. मतदार यादीत नावनोंदणी करण्यास इच्छुक असलेल्या मतदारांनी फोन केल्यास त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर निवडणूक शाखेचा कर्मचारी किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या एजन्सीचा कर्मचारी उपलब्ध होणार आहे. तो घरपोच येऊन अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि ओळखपत्र उपलब्ध करून देण्याचे काम केले जाणार आहे.

मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदारांची नोंदणी करणे आवश्यक आहे. केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत त्यासाठी नियमित नवीन मोहीम राबविल्या जातात. परंतु या वेळी हाती घेण्यात आलेली मोहीम नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मतदार नोंदणीसाठी सदोष शासकीय कार्यपद्धती कारणीभूत असल्याने अनेक जण मतदार यादीत नावनोंदणी करीतच नसल्याचा निष्कर्ष पुढे आल्यानंतर आयोगाने खासगी सेवाक्षेत्राप्रमाणे घरपोच सेवा देण्याची योजना हाती घेतली आहे. ही सेवा सशुल्क असून त्या राबविण्याबाबत केंद्रीय आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिले आहेत. त्यात 24 तासात सर्व प्रक्रिया पूर्ण करून मतदार नोंदणी करण्याच्या सूचना आहेत. कामात व्यस्त असणारे लोक या घरपोच सेवेचा लाभ घेऊ शकणार आहेत. त्यासाठी फीच्या स्वरूपात 50 रुपये द्यावे लागणार आहेत.

केस 1 : मतदार नोंदणीसाठी दोन वेळा अर्ज केला. काय त्रुटी आहेत हे कळायला मार्ग नाही. नवीन अर्ज करायला सांगितले जाते. वारंवार चकरा मारूनही मतदान कार्ड मिळत नाही. आता आणखी एकदा अर्ज करणार आहे.
-अश्विनी पारधे, राधाकृष्णनगर.

राज्यात लवकरच निर्णय
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला पत्र दिले आहे. आयोगाकडून अद्याप जिल्हास्तरावर या उपक्रमाच्या सूचना आलेल्या नाहीत. दरम्यान, जुलै महिन्यात ही प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

राजकीय समीकरण बदलणार
मतदार नोंदणीची प्रक्रिया सोपी झाल्याने मतदानाबात उदासीन असलेले अनेक लोक प्रवाहात येतील. मतदारांची संख्या वाढली तर मतदानाची टक्केवारीही वाढेल. मतदारांची जागरूकता राजकीय समीकरणे बदलविणारी ठरणार असल्याने राजकीय पक्षही त्यादृष्टीने प्रयत्नशील आहेत.

केस 2 : मतदार नोंदणी अभियानात एक वेळा आणि वैयक्तिक दोन वेळा नोंदणीसाठी अर्ज केला. मात्र, अजूनही कार्ड मिळाले नाही. सहा महिन्यांपासून कार्डची प्रतीक्षा आहे. मात्र, नाव नोंदणीचेही काहीच कळाले नाही.
-पराग अग्रवाल, रायसोनीनगर, मोहाडी रोड

दोन ठिकाणी नाव असलेल्या मतदारांना नोटीस बजावणार
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदार याद्या, ओळखपत्रातील त्रुटी दुरुस्तीची कामे निवडणूक यंत्रणेने हाती घेतली आहेत. फोटो उपलब्ध नसलेल्यांना नोटीस बजावून नावे वगळण्यात आली आहेत. तर दुसर्‍या टप्प्यात एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना नोटीस बजावून नावे वगळ्याचे अभियान हाती घेण्यात आले आहे.

नोकरीनिमित्त स्थायिक झालेले नागरिक मतदार यादीत नाव नोंदविताना मूळ गावातील यादीतही नाव कायम ठेवतात. त्यामुळे एकाच व्यक्तीचा दोन ठिकाणी मतदार यादीत समावेश असतो. त्यातील एक यादीतील नाव वगळावे लागणार आहे. कोणत्याही एकाच ठिकाणी यादीत नाव ठेवण्याचा पर्याय मतदारांना उपलब्ध करून दिला आहे. अशा मतदारांना निवडणूक यंत्रणेमार्फत नोटीस बजावण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष अभियान हाती घेण्यात आले.

अभियानाचा उद्देश
मतदारांची नेमकी संख्या पुढे येईल. नागरिकांना कोणत्याही एकाच ठिकाणी मतदार यादीत नाव नोंदविता येईल. कोठे नाव ठेवायचे याचा पर्याय उपलब्ध होईल. नोटीस बजावल्यानंतर मतदारांनी नाव कमी करण्यासाठी अर्ज न दिल्यास कोणत्याही एका ठिकाणी नाव ठेवून अन्य ठिकाणचे नाव वगळण्यात येईल.