Home »Maharashtra »North Maharashtra »Jalgaon» Jalgaon Municipal Corporation Hospital Issue

सीएफएलच्या प्रकाशात शस्त्रक्रिया; जळगावमधील धक्कादायक प्रकार

प्रतिनिधी | Feb 23, 2013, 10:27 AM IST

  • सीएफएलच्या प्रकाशात शस्त्रक्रिया; जळगावमधील धक्कादायक प्रकार

जळगाव- महापालिकेच्या रुग्णालयांमधील ऑपरेशन थिएटरमध्ये सर्व नियम धाब्यावर बसवून कामाचा गाडा हाकलला जात आहे. याबाबत ‘दिव्य मराठी’च्या पथकाने केलेल्या पाहणीत सीएफएल दिव्यांच्या प्रकाशात रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जात असल्याची गंभीर बाब उघड झाली आहे.

शहरात पालिकेची एकूण सात रुग्णालये आहेत. त्यातील तीन रुग्णालयांमध्ये प्रसूती किंवा कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरची सोय आहे. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यानंतर प्रकृती बिघडल्याने महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे पालिका रुग्णालयांतील सुविधांचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे. या महिलेची शस्त्रक्रिया झालेल्या चेतनदास मेहता रुग्णालयात असलेल्या ऑपरेशन थिएटरचा दर्जा अत्यंत सुमार आहे. हल्ली वैद्यकीय सेवेसाठी आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असली तरी, पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मात्र ती कोठेही दिसत नाही.

ऑपरेशन करण्यासाठी जुनाट पलंग
कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया झालेल्या चेतनदास मेहता रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरची जागा अवघी दहा बाय पंधरा स्क्वेअर फुटांची आहे. या ठिकाणी ऑपरेशन करण्यासाठी जुनाट पलंग आहेत. तसेच मरक्युरी लॅम्प असला तरी त्याचा वापर टाळत दोन सीएफएल दिव्यांच्या प्रकाशात शस्त्रक्रिया केली जाते. शिवाय ऑपरेशन थिएटरला लागून असलेल्या लॅबसाठी केबिन नसल्याने रुग्णांच्या वावरातच तपासणीचे काम केले जाते.

मानसेवी डॉक्टरांवर डोलारा
पालिकेच्या सर्वच रुग्णालयांमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया किंवा सीझर करायचे झाल्यास मानसेवी डॉक्टरांची मदत घेण्यात येते. चेतनदास मेहता रुग्णालयात डॉ. तिलोत्तमा गाजरे, डॉ. सुजाता महाजन, डॉ. पूनम दुसाने, डॉ. वैशाली चौधरी व डॉ. तुषार उपाध्ये असे पाच मानसेवी डॉक्टर सेवा देतात. तसेच डॉ. शिरीष ठुसे व डॉ. राजश्री शिंपी यांची पूर्णवेळ नियुक्ती आहे. रुग्णांची वाढती संख्या व रिक्त पदे भरण्यात न आल्याने मानसेवी डॉक्टरांवरच चेतनदास मेहता रुग्णालयाचा डोलारा उभा आहे.

रुग्णालयाचेच ‘आरोग्य’ धोक्यात!
सिंधी कॉलनी, एमआयडीसी, तांबापुरा, शिरसोली व चिंचोली या भागातून येणार्‍या रुग्णांना सेवा देणार्‍या चेतनदास रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात आहे. 18 ऑगस्ट 1970मध्ये बांधकाम झालेल्या या रुग्णालयाची दुरवस्था झाल्याने 2001 ते 2003पर्यंत हे रुग्णालय बंद करण्यात आले होते. त्यानंतर डागडुजी करून 7 जुलै 2004ला ते पुन्हा सुरू करण्यात आले. नंतर मात्र दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने या रुग्णालयाचेच ‘आरोग्य’ धोक्यात आले आहे.

रुग्ण, डॉक्टरांसाठी एकच टॉयलेट
या रुग्णालयाचे बांधकाम 42 वर्षे जुने झाले असून, भिंतींनाही तडे पडले आहेत. पाऊस येताच स्लॅबमधून गळती सुरू होते. तसेच गॅलरीची दुरवस्था झाली असून, खिडक्यांच्या काचाही फुटलेल्या आहेत. आवारातील बंद विहिरीची कचराकुंडी झाली आहे. त्याचप्रमाणे रुग्ण आणि डॉक्टरांसाठी एकच टॉयलेट आहे. रुग्णालयाची सन 2004 मध्ये डागडुजी व रंगरंगोटी करण्यात आली होती. त्यानंतर ऑपरेशन थिएटरसाठी नवीन साहित्य खरेदी केले नाही.


ही पहा चेतनदास मेहता रुग्णालयाची विदारक अवस्था

सुविधाहिन ऑपरेशन थिएटर
पालिकेच्या चेतनदास रुग्णालयात मानसेवी डॉक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याने अनेकदा ऑपरेशन थिएटरमध्ये काम केले. त्या ठिकाणी शॉडोलेस लॅम्प, बॉईल मशिन आणि आवश्यक साहित्य देखील उपलब्ध नसते. सिएफएल बल्बवर ऑपरेशन करणे अडचणीचे ठरते.
-डॉ. शैलजा चौधरी


ऑपरेशन थिएटरसाठी हे गरजेचे
पल्स अँक्टिमीटर, हृदय बंद पडल्यास विजेचे झटके देणारे यंत्र, बॉइल मशीन, सक्शन मशीन, सेंट्रलाइज ऑक्सिजन यंत्रणा, निर्जंतुकीकरणासाठी आधुनिक फॉगर मशीन व ऑपरेशन करताना पूर्वी वापरले जाणारे मक्र्युरी दिवे गरम होत असल्याने त्या जागी एलईडी संच बाजारात उपलब्ध आहेत.
-डॉ. अनिल पाटील, सचिव, आयएमए.

1. ऑपरेशन थिएटरमध्ये पलंगाच्यावर मक्र्युरी लॅम्प शेजारी लावण्यात आलेले सीएफएल दिवे.
2. वॉर्डामधील स्लॅब पावसाळ्यात गळत असल्याने भिंती अशा खराब झाल्या आहेत. तसेच खिडकींच्या काचादेखील फुटल्या आहेत.

Next Article

Recommended