आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव प्रभाग रचना: सरकारदरबारी गोंधळच गोंधळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- राजकीय व्यक्तींसाठी ज्याप्रमाणे प्रभागरचना उत्सुकतेची बाब ठरली आहे, त्याचप्रमाणे कच्चा आराखडा तयार करणार्‍या महापालिकेतील अधिकार्‍यांसाठी तापदायक गोष्ट ठरत आहे. दिवस कमी होत असताना अद्याप शासनाकडून कोणताही निर्णय दिला जात नसल्याने आदेशाची प्रतीक्षा लागून आहे. शासनाकडून मार्गदर्शन आल्याशिवाय प्रभागरचनेबाबतचे काम पुढे सरकणार नाही. त्यामुळे कोणती जनगणना ग्राह्य धरावी यावर आता खल सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने जनगणनेच्या आधारे लॉटस् पाडले आहेत. त्यानुसार प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात आला. लोकसंख्येच्या आधारे प्रभागरचना ढोबळमानाने तयार केली आहे. आयुक्तांनी मंजुरी दिल्यानंतर विभागीय आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे तो रवाना करण्यात येणार आहे.

शासनाच्या निर्देशाची प्रतीक्षा
महापालिका क्षेत्रातील कोणती लोकसंख्या ग्राह्य धरावी, याबाबत महापालिकेच्या अधिकार्‍यांमध्ये संभ्रम कायम आहे. 2001 की 2011 याबाबत अद्याप शासनाकडून कोणतेही मार्गदर्शक तत्त्व प्राप्त न झाल्याने कोणत्या काम मुद्यावर करावे याबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रभारी आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी कामाला सुरुवात करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या होत्या; परंतु शासनाकडून सूचना न आल्याने अधिकार्‍यांचा ताण वाढणार आहे. राजकीय गोटात प्रभाग रचना 15 फेब्रुवारीपर्यंत निश्चित होईल, असे सांगितले जात आहे.

सुरेश भोळेंकडेच राहणार महापालिकेचे गटनेतेपद
‘एक व्यक्ती, एक पद’ अशी व्यवस्था असलेल्या भारतीय जनता पक्षात महापालिकेच्या गटनेतेपदासाठी कोणीही इच्छुक नसल्याने जबाबदारी विद्यमान गटनेते सुरेश भोळे यांच्याकडेच राहणार आहे. भोळेंची महानगराध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर बदलाबाबत चर्चेला सुरुवात झाली होती; परंतु आगामी निवडणुकीसाठी तयारी करण्यास वेळ मिळावा, या विचारातून बदल अशक्य असल्याचे सांगितले जात आहे. गटनेतेपदी इतरांना संधी दिली जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीदेखील काही कार्यकर्त्यांना सांगितले होते; परंतु सहा महिन्यांनंतर महापालिकेची निवडणूक आहे. अशा परिस्थितीत चार-सहा महिन्यांसाठी जबाबदारी घेऊन आपल्या वॉर्डाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा पद न स्वीकारणेच योग्य असल्याचा सूर भाजप नगरसेवकांमध्ये आहे.

अद्याप निर्णय नाही
प्रभाग रचनेसंदर्भात महापालिकेच्या अधिकार्‍यांनाही मार्गदर्शन प्राप्त नाही. सन 2001 की 2011च्या जनगणनेतील लोकसंख्या लागू करावी, याबाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही. मी देखील विचारणा केली होती. परंतु अधिकारी देखील आदेशाच्या प्रतीक्षेत आहेत.
-नितीन लढ्ढा, गटनेते, खाविआ.

>शासनाकडून मार्गदर्शक तत्त्व आताच यायला हवी होती. उशीर होत असल्याने कामाचा ताणही वाढू शकतो. ढोबळमानाने जनगणनेनुसार लॉट बसवले आहेत. ते अंतिम नाहीत, त्यात बदलही होऊ शकतो.
-प्रकाश पाठक, अभियंता, नगररचना विभाग