आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनागोंदी कारभार: महापालिकेत कुणीही या अन् हवे ते दाखले न्या!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मक्तेदाराकडून दिले जाणारे जन्म-मृत्यूचे दाखले अचूक आहेत किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी पालिकेतर्फे नियुक्त करण्यात आलेला लिपिक आठ दिवसांपासून रजेवर आहे. असे असताना कुठलीही उलट तपासणी न होता मक्तेदाराच्या भरोशावर नागरिकांना दाखल्यांचे वितरण करण्यात येत आहे. कोरे स्वाक्षरी करून ठेवण्यात आलेले दाखले सहजासहजी नागरिकांच्या हातात पडत असून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे.

महापालिका हद्दीत जन्म-मृत्यूची नोंद घेऊन त्याचे दाखले देण्याचे काम जन्म-मृत्यू अधिनियम 1969 च्या कलम 12/17 अन्वये दाखले नागरिकांना तातडीने मिळावे, यासाठी मक्ते दाराची नियुक्ती केली आहे. मक्तेदाराकडून दिवसभरात देत असलेले दाखले अचूक आहेत किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी वरिष्ठ लिपिक शरद गाढे, लिपिक नितीन रानवे, संदीप तायडे, किरण तळेले अशा चार कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या विभागातील बहुतांशी कामाचा लोड मक्तेदार पार पाडत असल्याने नियुक्त केलेले कर्मचारी जागेवर आढळून न येता त्यांच्या जागेवर दुसराच कर्मचारी या टेबलावर आढळून येत असल्याची स्थिती आहे. मक्तेदाराने तयार केलेल्या दाखल्यांची तपासणी केल्यावर लिपिक व वरिष्ठ लिपिकाची स्वाक्षरी होते. शेवटची स्वाक्षरी आरोग्य अधिकार्‍यांची होते. मात्र, जबाबदारी सोपवलेले कर्मचारी रजेवर असून कोर्‍या दाखल्यांवर त्यांच्या स्वाक्षरी करून ठेवण्यात आल्या आहेत, त्यांचा कोठेही गैरवापर होऊ शकणार आहे.

मक्तेदाराकडून दिले जाणारे दाखले तपासणी होत नाही. संबंधित अधिकारी तेथे न थांबता त्याच्या जागी दुसराच कर्मचारी बसवण्यात येतो. कोर्‍या अर्जांवर स्वाक्षरी करून ठेवलेल्या अर्जांचा गठ्ठा या विभागात पडून असतो.
-किशोर चौधरी, नगरसेवक

दाखले तयार झाल्यावर त्यांची तपासणी केल्यावरच नियुक्त केलेले कर्मचारी स्वाक्षरी करतात. कोर्‍या दाखल्यांवर आधीच स्वाक्षरी करून ठेवणे चुकीचे असून असा प्रकार करणार्‍या कारवाई करण्यात येईल.
-विकास पाटील, आरोग्य अधिकारी