आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सह्याजीरावांवरून गाजली जळगाव महापालिकेची महासभा!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मस्टरवर सही करून पगार लाटणार्‍यांची संख्या महापालिकेत अधिक असून सह्याजीरावांच्या जागी मक्तेदाराची माणसे काम करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक इब्राहीम पटेल यांनी शुक्रवारी महासभेत केला. पालिकेतील सह्याजीरावांचा शोध घेण्याची मागणीही करण्यात आली. या संदर्भातील चौकशीला आमचा विरोध नसल्याचे खान्देश विकास आघाडीचे नेते रमेश जैन यांनी स्पष्ट केले.

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागात केवळ हजेरी लावून पगार लाटणार्‍यांपेक्षा बारा वर्षापासून प्रत्यक्ष काम करणार्‍यांना सेवेत सामावून घेण्याचा मुद्दा नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी महासभेत उपस्थित केला. याच विषयाला पुढे नेत सह्या करून पगार लाटणार्‍यांची संख्या पालिकेत अधिक असल्याचा आरोप इब्राहीम पटेल यांनी केला. कायम कर्मचारी काम करीत नसून सह्याजीरावांचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली. यावर रमेश जैन यांनी सह्याजीरावांची तक्रार तुम्ही प्रशासनाकडे करा, त्याला आमचा विरोध नसल्याचे स्पष्ट केले. जे काम न करता सही करून जात असतील त्यांना आम्ही पाठीशी घालणार नसल्याचे गटनेते नितीन लढ्ढा यांनी सांगितले. यावेळी अजेंड्यावरील विषयांसह आयत्या वेळचे विषय मंजूर केले.

पालिका खुलासा देणार
महात्मा फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केट गाळेप्रकरणी 30 व 90 वर्षांच्या कराराचा ठराव करून पाठवला होता. तो राज्य सरकारने निलंबित केला आहे. या प्रकरणी महापालिकेला एक महिन्याच्या आत खुलासा (अभिवेदन) दाखल करावा लागतो. प्रशासनाने सभागृहाच्या सहमतीने एक महिन्याच्या आत म्हणणे दाखल करण्याच्या नितीन लढ्ढा यांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

निलंबितांवर सत्ताधारी मेहरबान
चांबडेप्रकरणी अधिकारी, कर्मचारी निलंबित आहेत. मात्र त्यांची चौकशी सुरु झालेली नाही. या प्रकरणी चौकशी करून तातडीने निर्णय घेण्याची मागणी लढ्ढा यांनी केली. पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे कारण त्यांनी पुढे केले. चौकशीच्या अधीन राहून त्यांना कामावर घेण्याची शिफारस तीन महिन्यापूर्वीच केल्याचे उपायुक्तांनी स्पष्ट केले.

दोन दिवसात अहवाल
पाणीपुरवठा विभागातील सह्या करून पगार लाटणार्‍या कर्मचार्‍यांसंदर्भात पालिकेतील अधिकार्‍यांनी अद्याप मला कोणतीही माहिती दिलेली नव्हती. या प्रकरणी दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश आस्थापना विभाग प्रमुखांना दिले आहेत.
-ज्ञानेश्वर राजूरकर, आयुक्त महापालिका

उपाययोजनांकडे लक्ष
अधिग्रहित केलेल्या विहीर मालकाला पैसे देण्यास 7 वर्षांपासून अधिकार्‍यांकडून टाळाटाळ केली जात असल्याचे कैलास सोनवणे यांनी सांगितले. तसेच कर्मचारी भरतीत घोळ झाल्याचा आरोप करीत याची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. विष्णू भंगाळे, अशोक लाडवंजारी, इब्राहिम पटेल, यांनी पाणी समस्यांकडे लक्ष वेधले.