आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआघाडीसाठी पुन्हा प्रयत्न; विरोधकांना महानगर विकास आघाडी आणणार एकत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पालिकेत सत्तांतर घडवून आणण्यासाठी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी सर्व विरोधकांना एकत्र आणून महाआघाडीचा प्रयत्न सुरू केला होता. मध्यंतरी या संदर्भातील हालचाली थंड झाल्या असून बरीच राजकीय गणिते देखील बदलली आहेत. एकजुटीने लढले तरच पालिकेत सत्तांतर होऊ शकते, या मताशी ठाम असलेल्या महानगर विकास आघाडीचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याकडून विरोधकांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत.

घरकुल योजनेमुळे सत्ताधारी अडचणीत आले असून या संधीचा फायदा घेण्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी लावली आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत आमदार सुरेश जैन यांचे विरोधक म्हणून परिचित असलेल्या नरेंद्र पाटील यांची निवडणुकीतील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यंदा 75 उमेदवार निवडून द्यायचे असून यात 50 टक्के महिला आरक्षण असून संपूर्ण जागा लढवण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे सक्षम उमेदवार नाहीत. याची जाणीव असल्याने भारतीय जनता पक्ष तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेत सर्वांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने चाचपणी केली होती. महाआघाडीच्या दृष्टीने अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. एकत्र लढण्यास इच्छुक असलेल्या पक्षांमधील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये दुमत आहे.

पालिकेच्या दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सत्ताधार्‍यांच्या विरोधात विविध पक्षाच्या झेंड्याखाली लढलेल्या उमेदवारांना मिळालेल्या मतांची बेरीज खान्देश विकास आघाडीला मिळालेल्या मतांपेक्षा जास्त होती. विरोधक एकत्र येऊन लढल्यास चित्र पालटू शकते, याची खात्री असल्याने नरेंद्र पाटील यांच्याकडून पुन्हा एकदा प्रयत्न केले जाणार आहेत.

एकत्र येण्यातच फायदा : अतिआत्मविश्वासामुळे पालिका निवडणुकीत विरोधक वेगवेगळे लढल्याने मतांचे विभाजन झाले. यामुळे पालिकेत सत्तांतर होऊ शकले नाही. विरोधक एकत्र येऊ नये, यातच सत्ताधार्‍यांचा फायदा आहे. गेल्या वेळप्रमाणे या वेळी तीच चूक इतरांनी करू नये, यासाठी सर्वांनी एकत्र लढावे यासाठी आपण प्रयत्न करणार आहे, असे महानगर विकास आघाडीचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

आघाडीसाठी भेटीगाठी वाढल्या
कॉँग्रेसमधील एक गट खान्देश विकास आघाडीसोबत जाण्यास इच्छुक असून, दुसरा गट राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यालयातून सोमवारी 15 जणांनी अर्ज घेतले व काही माजी नगरसेवकांनी जिल्हाध्यक्षांसह महानगराध्यक्षांशी चर्चा केली. कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उदय पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक यांच्यात आघाडीवर चर्चा झाली.

नरेंद्र पाटील-विष्णू भंगाळे लढत अटीतटीची शक्य
महापालिकेच्या सभागृहात जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी अजेंडा हाती घेऊन राजकीय पक्षांसोबत सामाजिक कार्य करणार्‍या संघटनाही रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यादृष्टीने नुकतीच अखिल भारत हिंदू महासभेची बैंठक रविवारी गोलाणी मार्केटमध्ये झाली. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष नारायण अग्रवाल होते. यात महापालिकेची निवडणूक ताकदनिशी लढणार असल्याचा निर्धार करण्यात आला. या वेळी मानवी अन्याय निवारण केंद्राचे अध्यक्ष उमाकांत वाणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीसाठी समिती गठित करण्यात आली आहे. अँड. गोविंद तिवारी यांनी या वेळी मार्गदर्शन केले. राजकीय पक्षांसोबत सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍या संघटनाही आता राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारी असल्याने यात वाढ होण्याची शक्यता आहे.

महानगर विकास आघाडीचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या वॉर्डातील लढत यंदा रंगतदार होण्याची शक्यता आहे. त्यांना शह देण्यासाठी माजी महापौर विष्णू भंगाळे यांना रिंगणात उतरवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

नवीन वॉर्डरचना काहींसाठी सोयीची, तर काहींसाठी अडचणीची झाली आहे. तसेच विद्यमान नगरसेवकांकडून सोयीचा वॉर्ड शोधला जात असून, काही ठिकाणी विद्यमान नगरसेवकांवर समोरासमोर लढण्याची वेळ येणार आहे. विद्यमान नगरसेवक नरेंद्र पाटील यांचा सध्याचा वॉर्ड क्रमांक 28 व विद्यमान नगरसेवक तथा माजी महापौर विष्णू भंगाळे यांचा सध्याचा वॉर्ड क्रमांक 27 मिळून नवीन 20 क्रमांकाचा वॉर्ड तयार झाला आहे. सत्तेत राहिल्याने वॉर्डात रस्ते, गटारींचे एकही काम शिल्लक न ठेवणार्‍या विष्णू भंगाळे यांना आपल्या कामगिरीमुळे नवीन वॉर्ड सोयीचा वाटत आहे. दुसरीकडे विरोधी बाकावर बसल्याने विकासकामे करू न शकणारे नरेंद्र पाटील यांना वैयक्तिक संबंधांमुळे आपली बाजू मजबूत वाटत आहे. गेल्या वेळी खान्देश विकास आघाडीने नरेंद्र पाटील यांच्याविरोधात दुर्गादास नेवे यांना रिंगणात उभे केले होते.