आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजब कारभार: सांडपाण्यामुळे संशोधन वाया, पाणी तुंबल्यामुळे पसरली दुर्गंधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील सांडपाण्याचे योग्य नियोजन न करता सांडपाणी थेट शेतात सोडून दिल्यामुळे कृषी महाविद्यालयाची जमीन नापीक होण्याच्या मार्गावर आहे. सांडपाणी बियाणे संशोधनासाठी पेरणी करण्यात आलेल्या क्षेत्रात घुसल्यामुळे पेरणी केलेली 10 हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत.

निमखेडी रस्त्यावर असलेल्या कृषी महाविद्यालयाची 29 हेक्टर जमीन आहे. त्यात केळी संशोधन केंद्र, तेलबिया संशोधन केंद्राचे काम सुरू आहे. महाविद्यालयाकडूनही प्रात्यक्षिकांसाठी जमीन उपयोगात आणली जाते. मात्र, पावसाळ्यात शहरातील सांडपाण्याचा फलो वाढल्याने पिंप्राळा, प्रेमनगर, भिकमचंद नगर, हायवे दर्शन कॉलनी, निमखेडीरोड या भागातील सर्व पाणी कृषी महाविद्यालयात धडकते. महाविद्यालयाच्या जमिनीला लागून दोन किलोमीटर समांतर असलेली कच्ची गटर ठिकठिकाणी फुटली आहे. त्यामुळे शेतात पाणी साचले आहे.

महापालिकेची डागडुजी
शेतात पाणी शिरल्याने पिकाचे नुकसान झाल्यामुळे महाविद्यालय प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेताच महापालिकेकडून तात्पुरती डागडुजी करण्यात आली. जेसीबी मशीन लावून नाला खोलीकरण करण्यात आले. तरी देखील मुख्य प्रश्न कायम आहे.

शेतीचे आरोग्य धोक्यात
महाविद्यालयाची जमीन अत्यंत सुपीक आहे. मात्र, महापालिकेच्या सांडपाण्यामुळे काही भागात पिके घेता येत नाही. सतत सांडपाणी तुंबत असल्याने जमीन नापीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शेतीसाठी घातक असलेली अनेक रसायने, कचरा, प्लास्टिक, सांडपाणी शेतातील नाल्यात मधोमध तुंबल्याने दुर्गंधी पसरली आहे. शेतीचे आरोग्य त्यामुळे खराब होत असल्याचे कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञांचे मत आहे.

काय आहे स्थिती
0 महाविद्यालयाला लागून असलेली दोन किलोमीटरपर्यंत गटारीचे पाणी शेतात शिरले, पाणी पाझरत असल्याने लगतची जमीन नापीक.
0 दोन ठिकाणी शेताच्या मध्यातून जाणारा दीड किलोमीटरचे नाले तुडुंब भरून पाणी शेतात.
0 सोयाबीन, भुईमुगाच्या बियाणे संशोधनासाठी पेरणी केलेले क्षेत्र सांडपाण्याखाली.
0 पंधरा दिवसांपासून पाण्यात असल्याने पीक हातचे जाणार.

> उद्या या भागात अधिकार्‍यांसोबत जाऊन परिस्थितीची पाहणी करेल. संबंधित समस्येवर लवकरच तोडगा काढू.
- किशोर पाटील, महापौर

>पालिकेच्या सांडपाण्यामुळे शेतीचे नुकसान होत असल्याने आम्ही सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. अनेक वेळा आयुक्त आणि पदाधिकार्‍यांनाही भेटलो. परंतु कार्यवाही झालेली नाही.
-एस.जे.पवार, प्राचार्य शासकीय कृषी तंत्र महाविद्यालय.