आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावातदेखील सांगली महापालिकेची पुनरावृत्ती शक्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सांगलीच्या जनतेप्रमाणेच जळगावची जनताही महापालिकेतील सत्ताधार्‍यांच्या दुष्कृत्यांना वैतागली आहे. त्यामुळे सांगलीप्रमाणेच जळगावातही कॉंग्रेसला मतदारांचा कौल मिळू शकतो, असा आशावाद कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि जिल्हय़ाचे प्रभारी अँड. रामहरी रुपनवार यांनी आज व्यक्त केला.

दैनिक दिव्य मराठी कार्यालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर ते संपादक विभागातल्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते. पक्षाचे जिल्हाध्यक्ष उदय पाटील, रावेरचे माजी तालुकाध्यक्ष वासुदेव महाजनही त्यांच्यासमवेत होते. अँड. रुपनवार यांच्याशी झालेल्या चर्चेच्या वेळी त्यांनी मांडलेले मुद्दे त्यांच्याच शब्दात असे.

>विधान परिषदेचे सदस्य मनीष जैन यांच्याशी अजून चर्चा झालेली नाही. त्यांनीही प्रस्ताव दिलेला नाही. ते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत असे कळाले आहे. पाहू, पुढे काय होते.

>या दौर्‍यात अनेक जुन्या निष्ठावान काँग्रेस पदाधिकार्‍यांकडे प्रदेश कॉंग्रेसचा पाईक म्हणून गेलो. त्यांच्या योगदानाला सॅल्यूट केला आणि त्यांना पुन्हा सक्रीय होण्याचं आवाहन केलं. त्यामुळे आता ते सक्रीय झाले आहेत.

>सांगली पालिकेतील सत्ताधार्‍यांविषयी लोकांमध्ये चीड होती. मी तिथे जाऊन आमच्या आणि मित्र पक्षांतील नाराजांना जवळ केल्यामुळे अंतर्गत दुही मिटली व पक्षाला यश मिळालं.

>जळगावमध्ये मी चार चार माणसं सर्वच भागात पाठवली आणि सर्वसामान्यांची मतं जाणून घेतली. तेव्हा सांगलीसारखंच इथलंही वातावरण आहे हे लक्षात आलं. 75 उमेदवार आम्ही देऊ शकलो तर नक्की वेगळं चित्र दिसेल.

>आम्ही सत्तेत आलो तर या महापालिकेला सरकारकडून मदत मिळवू शकतो. कारण सरकार आमच्याच पक्षाचं आहे. लोकांनाही ते माहिती आहे. त्यामुळे जळगावकर कॉंग्रेस बरोबर राहातील, असे वाटते.

>स्वबळावर निवडणूक लढवायची म्हणत असलो तरी तसा आमचा प्रयत्न असेल. इथे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष महापालिकेत अशक्त आहेत. त्यामुळे कदाचित मतविभागणी होऊ नये म्हणून एकत्रित लढण्याचाही विचार पुढे येऊ शकतो. ते ठरवायला अजून वेळ आहे.

>आज आमच्या पक्षाकडे जे उमेदवारी मागताहेत त्यात डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, वकील आहेत. उमेदवारी मागण्यासाठी सुमारे 500 महिला वाजत गाजत येऊन गेल्या. हे सर्व चित्र खूपच आशादायक आहे. त्यामुळे आमचा उत्साह आणि आत्मविश्वास खूप वाढला आहे.

>प्रचाराचं साहित्य, नेत्यांच्या सभा, मुख्यमंत्र्यांची एखादी जाहीर सभा असं सर्व काही देण्याचं आश्वासन मी कार्यकर्त्यांना दिलं आहे. मी सत्ताधारी नेता नसल्याने तेवढच सांगू शकतो आणि त्यामुळेच जाहीरपणे बोलूही शकतो.

>पक्षाला नेते मिळतात ते निवडणुकीच्या माध्यमातूनच. त्यामुळे आज काँग्रेसकडे स्थानिक पातळीवर तुल्यबळ नेतृत्व नाही, असं म्हटलं जात असलं तरी येत्या निवडणुकीतून आमच्या पक्षाला तुल्यबळ नेतृत्व मिळालेलं असेल.

>पक्षाचे संपर्कमंत्री जिल्हय़ात संपर्क ठेवतच नाहीत, ही बाब माझ्या कानावर वारंवार आली आहे आणि त्या बाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली आहे. त्यामुळे कदाचित संपर्कमंत्री बदललेही जातील किंवा निदान महापालिका निवडणुकीपुरते तरी संपर्कमंत्री बदलले जातील, अशी आशा आहे. शेवटी मुख्यमंत्रीच तो निर्णय घेऊ शकतात.