आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौभ्याग्यलेण्यासह 59 वस्तू होणार करमुक्त; महापालिकेतर्फे वस्तूंची सूची सादर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका हद्दीत येणार्‍या सौभाग्यलेण्यासह पारंपरिक ऊर्जेची साधने, अन्नधान्य, शेतीसाठी लागणारी पारंपरिक साधने, बी-बियाणे यासह 59 वस्तू लवकरच करमुक्त होणार आहेत. पालिका प्रशासनातर्फे या संदर्भातील सुधारित दराची सूची मान्यतेसाठी राज्य शासनाकडे सादर केली आहे.

राज्यभरातील 25 महापालिकांमध्ये स्थानिक संस्था कराची अंमलबजावणी करताना सर्व ठिकाणी अनुसूची ‘ब’ मधील वस्तूंचे दर समान ठेवण्यात आलेले आहेत. जळगाव महापालिकेत सर्वात अगोदर एलबीटी लागू होऊनही केवळ 29 वस्तूंवरील कर नाममात्र होते. राज्यातील मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये दर लागू करताना 59 प्रकारच्या वस्तू करमुक्त करण्यात आल्या आहेत. करासंदर्भातील तफावत दूर करण्याची मागणी जळगाव पालिकेतील व्यापारी समन्वय समितीचे सदस्य पुरुषोत्तम टावरी, प्रवीण पगारिया व इतर सदस्यांनी लावून धरली होती. व्यापार्‍यांची मागणी रास्त असल्याने प्रशासनाकडूनही सुधारित दरसूची ‘ब’ शासनाकडे सादर करण्याची तयारी ठेवली होती. मध्यंतरी पालिका निवडणूक आचारसंहितेमुळे हे प्रकरण थांबले होते. आचारसंहिता आटोपल्यानंतर राज्याचे नगरविकास विभागाचे सचिव श्रीकांत सिंग यांच्याकडे आयुक्त संजय कापडणीस यांनी सुधारित दरसूची सादर केली आहे. राज्य शासनाकडून तांत्रिक मंजुरी दिल्यानंतर जळगाव महापालिका हद्दीत येणार्‍या 59 वस्तूंवर स्थानिक संस्था कर आकारला जाणार नाही.

या व्यावसायिकांना मिळणार दिलासा
काचेच्या बांगड्या, कुंकू, सिंदूर, बिंदी (टिकली), अन्नधान्य, दाळी, रवा, मैदा, गूळ, हळद, मिरची पावडर, नारळ, कथ्था, कापूर, लोभान, पूजेचे साहित्य, शेतीची पारंपरिक अवजारे, खादीचे कापड, सौर ऊर्जेची साधने, सायकली, बेबीसायकल, पॅकेजिंग दूध, अंडी, सर्व भाजीपाला, व पाळीव प्राण्यांचे खाद्यपदार्थ या वस्तू करमुक्त यादीत टाकण्यात आल्या आहेत. राज्य शासनाच्या मान्यतेनंतर या वस्तूंवर स्थानिक संस्था कराची आकारणी केली जाणार नाही. त्यामुळे संबंधित व्यावसायिकांना दिलासा मिळेल.