आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात पालिका फंडातून कामे; ठेकेदार थांबणार बिलांसाठी दोन वर्षे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- पालिकेची आर्थिक स्थिती अडचणीची असल्याने कामांचे तत्काळ पेमेंट करणे प्रशासनाला शक्य नाही. मात्र, काम केल्यावर दोन वर्ष पैसे न मागण्याच्या अटीवर काम करण्यास काही मक्तेदारांनी सुमारे एक कोटींची कामे करण्याची तयारी दर्शविली आहे. यातील 40 लाखांच्या कामांसाठी पालिका प्रशासनानेही निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
पालिकेकडे पैसा नसल्याने पालिका फंडातून कामे करण्यास मक्तेदार तयार होत नसल्याची स्थिती होती. मात्र माजी नगरसेवक भगत बालाणी यांनी वॉर्डात एक कोटीची कामे करण्याची तयारी दर्शविली होती. याच वेळी मनसेच्या नगरसेवकांनीही पेमेंटसाठी दोन वर्ष थांबण्याची तयारी दर्शवत विकासकामांची तयारी दर्शविली होती. याचा गांभीर्याने विचार करून प्रशासनातर्फे शहरातील कामांच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
या अंतर्गत 10 ते 24 डिसेंबरपर्यंत निविदा फॉर्मची विक्री करण्यात येणार आहे. अनामत 27 डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहे. शक्य झाल्यास 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता निविदा उघडून पुढील प्रक्रिया होणार आहे. प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्यावर जानेवारीच्या अखेरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होण्याची शक्यता आहे. टप्प्याटप्प्याने पालिका फंडातील इतर कामांच्या निविदा प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पैसे नसताना पालिकेला कामे करणे शक्य आहे.
पालिका निधीतून होत असलेल्या कामांच्या पहिल्या टप्प्यातील निविदा प्रसिद्धीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 39 लाख 79 हजार 635 रुपयांचीही कामे आहेत. यातील 7 पैकी 4 कामे (आरसीसी गटार बांधणे) वॉर्ड क्रमांक 5 मध्ये आहेत. वॉर्ड 23 मध्ये रस्ता काँक्रिटीकरण करणे व आरसीसी गटार करण्याचे काम आहे. वॉर्ड 21 मध्ये रस्ता रिसरफेसिंग करण्याचे काम आहे.
दोन वर्षानंतर पेमेंट
पालिका फंडातून होणार्‍या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात येत आहे. यातील अटी शर्तींमध्ये मक्तेदाराने दिलेले काम पूर्ण केल्यावर दोन वर्षानंतर व निधीच्या उपलब्धतेनुसार प्राधान्यक्रमाने पेमेंट केले जाईल, अशी अट टाकण्यात आली आहे.
-एस.एस.भोळे, शहर अभियंता