आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका आयुक्त म्हणतात, ‘वर्षभरात कर्जमुक्ती शक्य’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव महापालिकेची कोणतीही मालमत्ता न विकताही वर्षभरात महापालिकेला कर्जमुक्त करता येईल, असा विश्वास आयुक्त संजय कापडणीस यांनी व्यक्त केला. गुरुवारी ‘दिव्य मराठी’ कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी काही अनुभवही सांगितले.

निवडणूक कामाच्या ताणातून मुक्त झाल्यानंतर आयुक्तांनी चहापानाचे आमंत्रण स्वीकारत ही भेट दिली. ते म्हणाले की, स्वतंत्रपणे निवडणूक हाताळण्याची ही आपली पहिलीच वेळ होती; पण सर्वांनीच केलेल्या सहकार्यामुळे ती निर्विघ्नपणे पार पडली याचं समाधान आहे.

जळगाव आपल्यासाठी नवे नव्हते, असे नमूद करून ते म्हणाले की, सन 1992-93मध्ये जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) या पदावर प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले होते. त्यावेळची नगरपालिका पाहिलेली असल्याने जळगावला आयुक्त म्हणून यायची आपली इच्छा नव्हतीच. त्यामुळे आठ महिन्यांत चार वेळा आपल्या नावाचा प्रस्ताव रद्द करवून घेतला होता. मात्र, नंतर मला जावेच लागेल असे वरिष्ठांकडून सांगण्यात आल्याने यायला तयार झालो. मात्र, जळगावकर खूप चांगले आहेत याचा अनुभव गेल्या तीन महिन्यांपासून आपण घेत आहोत.

पालिकेला 350 ते 400 कोटी रुपयांचे देणे आहे. 40 ते 50 कोटी रुपये मक्तेदारांची देणी थकली आहेत. महापालिका कर्मचार्‍यांचे सध्या एक महिना उशिराने पगार सुरू आहेत. योग्य वेळी पावले न उचलल्यास परिस्थिती आणखी गंभीर होत जाईल आणि काही काळानंतर या महापालिकेला कोणी वाचवू शकणार नाही, अशीही अवस्था होऊ शकेल. त्यामुळे आताच काही कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले.

महापालिकेच्या मालमत्ता विकणे हा पर्याय योग्य वाटत नाही
महानगरपालिकेच्या मालमत्ता कर्जफेडीसाठी विकणे, हा काही पर्याय असू शकत नाही; असे नमूद करून आयुक्त म्हणाले की, निधी उभारण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत जे कर्ज फेडण्याइतपत निधी उभा करवून देतील. नव्याने येणार्‍या नगरसेवकांना आणि पदाधिकार्‍यांना विश्वासात घेऊन हे पर्याय आपण त्यांच्या समोर ठेवणार आहोत.

सध्या महापालिकेकडे पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती स्वीकारून उपलब्ध निधीत काय करता येणे शक्य आहे, याचा आराखडा तयार करायला महापालिकेच्या सर्व अधिकार्‍यांना सांगितले आहे. त्यातून जे चित्र समोर येईल ते नवनिर्वाचित नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांसमोर ठेवले जाईल. आवश्यकता वाटली तर जळगावकरांनाही ते समजावून सांगितले जाईल. लोकांना समजावून सांगितले तर लोकं ऐकतात; हा आपला अनुभव आहे, असेही त्यांनी सांगितले.

महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याच्या अनेक संधी असून उत्पन्नाचे सर्व मार्ग कार्यप्रवण केले जातील. त्यासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. त्याच वेळी अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणणेही आवश्यक असेल. गेल्या तीन महिन्यांत महापालिकेच्या कोणत्याही वाहनाच्या कोणत्याही फेर्‍या कमी न करता इंधन खर्चात 6 ते 7 लाख रुपये प्रती महिना बचत होत आहे.

जिथे मुद्दलापेक्षा किती तरी अधिक रक्कम कर्ज म्हणून फेडली आहे तिथे आणखी किती कर्ज फेडायचे? संबंधित संस्थांशी बोलण्याची आवश्यकता आहे.

जिथे महापालिकेचे काम सुरू असेल तिथे त्या कामाच्या खर्चासह सर्व तपशील देणार्‍या मजकुराचा फलक लावण्याची सक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे कामाचा दर्जाही राखला जाईल आणि नागरिकांच्या अवाजवी अपेक्षाही राहाणार नाहीत, असेही आयुक्त म्हणाले.

पुढील स्लाईड्‍सवर भावमुद्रा..:.'आयुक्त संजय कापडणीस यांनी ‘दिव्य मराठी’ कार्यालयात दिलखुलासपणे गप्पा मारल्या. विविध मुद्यांवर चर्चा करताना त्यांच्या या भावमुद्रा टिपल्या आहेत छायाचित्रकार आबा मकासरे यांनी.'