आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाही राबवू शकते आरोग्यसेवेचा नांदेड पॅटर्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेकडून नागरिकांच्या आरोग्यावर होणार्‍या खर्चापेक्षा पगारावरील खर्च चारपट असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जळगावकरांना खरंच दर्जेदार आरोग्य सेवा द्यायची असेल तर सेवाभावी संस्थांना सोबत घेऊन महापालिका संयुक्तरीत्या प्रकल्प राबवू शकते. नांदेड पालिकेने तीन वर्षांपूर्वी लायन्स क्लबसोबत सुरू केलेल्या प्रकल्पाचे उत्तम उदाहरण असू शकते.

महापलिकेच्या आरोग्य विभागाकडून वर्षाला 6.25 कोटी रुपये वैद्यकीय सेवा देण्यासाठी खर्च होत असतात. यातील 6.12 कोटी रुपये निव्वळ पगारावर खर्च होत असल्याचे चित्र आहे. हीच सेवा खासगी रुग्णालयातून घेतली असती तर त्यावरील खर्च 2.75 कोटी रुपये आला असता. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर येणारा ताण व त्या तुलनेत मिळणार्‍या सुविधा ह्या अतिशय सुमार असल्याची वस्तुस्थिती आहे.

नांदेड पालिकेने राबवला प्रयोग : नांदेड वाघाळा महापालिकेला लायन्स क्लबने नाममात्र दराने 30 वर्षांच्या करारावर मनपाच्या रुग्णालयाची इमारत मिळावी, असा प्रस्ताव दिला होता. त्यावर निर्णय घेण्यासाठी महापौरांसह पाच जणांची समिती गठित झाली. यात सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यावर एकमत झाल्यानंतर सर्वसाधारण सभेत 30 डिसेंबर 2010 रोजी ठराव पारित झाला. तीन वर्षांपासून लायन्स क्लब व नांदेड मनपाच्या विद्यमाने नेत्र प्रकल्प सुरू आहे.

जळगावातही आले प्रस्ताव : महापालिकेच्या महासभेत 28 नोव्हेंबर 2013 रोजी ठराव क्रमांक 24 पारित झाला. यात सेवाभावी संस्थांना महापालिका रुग्णालय ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालवण्यासाठी दिल्यास नागरिकांना उत्तमोत्तम रुग्णसेवा माफक दरात व वेळेत उपलब्ध करून देणे सहज शक्य होईल, असे म्हटले आहे. यासाठी रोटरी क्लब जळगावने अल्प दरात कॅन्सर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर तसेच स्टडी व ट्रेनिंग सेंटर व नि:शुल्क कॅन्सर संबंधातील माहिती केंद्रासाठी पाच कोटींपर्यंत गुंतवणुकीसाठी प्रय}शील राहू, असा मानस व्यक्त केला आहे. त्याचप्रमाणे रोटरी क्लब ऑफ इस्ट तसेच खान्देश जिनिंग अँण्ड प्रेसिंग ओनर्स अँण्ड ट्रेडर्स असोसिएशन व लायन्स क्लब जळगाव यांनीदेखील प्रस्ताव दिले आहेत.

डायलिसिस मशीनसाठी पुढाकार : रेडस्वस्तिक या सामाजिक संस्थेला 5 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. यातून जळगाव शहरासाठी पाच डायलिसिस मशीन देण्यात येणार आहे. शिव जयंतीच्या कार्यक्रमाला रेडस्वस्तिकचे पदाधिकारी अशोक शिंदे यांनी सभापती नितीन लढ्ढा, आयुक्त संजय कापडणीस यांच्या उपस्थितीत डायलिसिस मशीनची सेवा देण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यामुळे डायलिसिससारखा महागडा उपचार कमी दरात उपलब्ध होऊ शकतो.

शासनाक डे पाठपुरावा नाही
महासभेत यासंदर्भात ठराव पारित होऊन आता तीन महिने पूर्ण होत आहेत. यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या. परंतु तसे होऊ शकले नाही. सेवाभावी संस्थांची पार्श्वभूमी तपासून खात्री झाल्यानंतर नाममात्र भाड्याने जागा दिल्यास महागडे उपचार अत्यंत कमी दरात उपलब्ध होऊ शकतील, असे स्थायी समिती सभापती नितीन लढ्ढा यांनी सांगितले.

खासगी संस्थांच्या माध्यमातून सेवा
जळगावकरांना खरंच मोफत व चांगल्या वैद्यकीय सुविधा द्यायच्या असतील व पालिकेवरील आर्थिक ताण कमी करायचा असेल तर सेवाभावी संस्था व महापालिका अशा संयुक्त विद्यमाने प्रायोगिक तत्त्वावर उपक्रम राबवता येईल. त्यामुळे या संस्थांना आंतरराष्ट्रीयस्तरावरून मिळणार्‍या निधीचा जळगावकरांच्या आरोग्यासाठी उपयोग करून घेता येईल.