जळगाव - लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता काम सुरूअसल्याच्या मुद्यावरून आयुक्तांना कात्रीत पकडण्याच्या हालचाली सत्ताधारी गटाकडून सुरू आहेत. शहरातील विकासकामांच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी महासभा असल्याने या सभेत अजेंड्यावरीलच विषयांवर चर्चा करून सभा शांततेत पार पाडण्याच्या सूचना सत्ताधारी गटातील नगरसेवकांना आहेत. महासभा आटोपल्यानंतर सत्ताधारी आयुक्तांच्या संदर्भातील भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.
प्रशासनाकडून सफाई मक्तेदारांची देणी वेळेवर अदा केली जात नसल्याने मक्तेदाराची माणसे काम करत नसल्याची स्थिती आहे. किरकोळ देणीदेखील प्रशासनाकडून अदा केली जात नसल्याचा ठपका ठेवत सत्ताधारी आणि आयुक्तांमध्ये सद्या मतभेद सुरू आहेत. याचे पडसाद मंगळवारी होणार्या महासभेत उमटण्याची शक्यता आहे.
नेहमीप्रमाणे महासभेपूर्वी खान्देश विकास आघाडीच्या नगरसेवकांची बैठक सोमवारी सायंकाळी झाली. या बैठकीत अजेंड्यावरील विषयांवर चर्चा करून सभा शांततेत पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हुडकोला कर्जफेडीसाठी परस्पर हप्ता ठरविणे, लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करणे अशाप्रकारचे धोरणात्मक निर्णय घेण्यापूर्वी सभागृहाला विश्वासात न घेता आयुक्त परस्पर काम करत असल्याची भावना नगरसेवकांमध्ये बळावत आहे. या संदर्भात महासभेनंतर सत्ताधारी आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.