आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Not Paid 17 Lacs Of Candidate

जळगाव मनपाने रोखले उमेदवारांचे 17 लाख

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिका निवडणुकीला दोन महिने उलटले आहेत; मात्र अद्यापही नामनिर्देशनपत्र भरलेल्या 404 उमेदवारांनी त्यांनी भरलेली अनामत रक्कम अदा करण्यात आलेली नाही. रक्कम मिळावी म्हणून अर्जांचा पाऊस पडल्यानंतरही प्रशासनाकडून कासवगतीने हालचाली सुरू असल्याने विजयी व पराभूत उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे. आता सुटी असल्याने येत्या आठवड्यात रक्कम अदा करण्यात येईल, असे भाकीत अधिकार्‍यांकडून केले जात आहे.

महापालिकेच्या 37 प्रभागातील 75 जागांसाठी 1 सप्टेंबर रोजी निवडणूक झाली. त्यात 611 जण निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. त्यापैकी 205 जणांनी माघारीच्या दिवशी हजेरी लावून नामनिर्देशनपत्र मागे घेतले होते. त्यामुळे प्रत्यक्षात 406 उमेदवारांनीच भाग्य अजमावले. निवडणुकीच्या मतमोजणीनंतर 207 जणांना विजयी उमेदवारांपेक्षा अत्यंत कमी मतदान झाल्याने त्यांचे डिपॉझिट (अनामत) जप्त करण्यात आल्याची घोषणा प्रशासनातर्फे करण्यात आली होती. परंतु ज्यांचे डिपॉझिट वाचले त्यांना रक्कम केव्हा मिळणार याचा कोणताच खुलासा करण्यात आला नव्हता. अखेर प्रशासन रक्कम देण्याचे नावच घेत नसल्याने सुमारे 400 जणांनी रक्कम परत मिळावी म्हणून रीतसर अर्ज दाखल केले आहेत. त्यात निवडणुकीत झालेला खर्च, अनामत रकमेची पावती यासारखे पुरावेही जमा केले. परंतु अद्यापही त्यावर निर्णय न झाल्याने पालिकेच्या कारभाराविषयी नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.

असा होता नियम
निवडणूक लढण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार्‍या खुल्या गटातील उमेदवारांना पाच हजार तर मागासवर्गीय प्रवर्ग तसेच महिला उमेदवारांना प्रत्येकी 2500 रुपये जमा करणे बंधनकारक होते. त्यातही ज्या उमेदवारांना निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या मतापेक्षा एक अष्टमांश मते मिळाली नाहीत त्यांना डिपॉझिट मिळणार नाही असा नियम आहे. त्यामुळे पुरेशी मते मिळालेल्या 404 जणांनी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत.

17 लाखांपेक्षा जास्त आकडा
निवडणूक लढलेले 406 व माघार घेतलेले 205 जणांची मिळून सुमारे 17 लाखांपेक्षा जास्त रक्कम आहे. यासाठी पालिकेकडे रक्कम मिळावी म्हणून अर्ज करण्यात आले आहेत. त्याची पडताळणी करून ती अकाउंट विभागाकडे सादर करण्यात आल्याचे बर्‍याच दिवसांपासून सांगितले जात आहे.

रक्कम मिळालेली नाही
माझ्या परीने पालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 अ मधून उमेदवारी अर्ज भरला परंतु काही कारणांमुळे माघार घेतली होती. त्यामुळे निवडणुकीनंतर अडीच हजार रुपये अनामत रक्कम परत मिळावी म्हणून चकरा माराव्या लागत आहेत. प्रशासनाने ती त्वरित द्यावी. पी.एस.पाटील, श्रीरत्‍न कॉलनी.

आठवडाभरात देणार रक्कम
अनामत कितीही दिवसात परत करता येते. परंतु बर्‍याच जणांनी खर्चाची माहिती जमा न केल्याने तसेच इतर कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे अडचणी आल्या होत्या. गुरुवारीच धनादेश स्वाक्षरीसाठी आले आहेत. परंतु धनादेशांची संख्या चारशेपेक्षा जास्त असल्याने दोन दिवस वेळ लागेल. पालिकेला सुटी असल्याने आठवडाभरात रक्कम अदा केली जाईल. साजिदखान पठाण, अतिरिक्त आयुक्त.

प्रक्रिया पूर्ण केली
अकाउंट विभागाकडे 25 ऑक्टोबर रोजी उमेदवारांच्या अनामत रकमेविषयीची माहिती आली आहे. त्यावर तपासणी केल्यानंतर कामकाज पूर्ण झाले आहे. गुरुवारीच अंतिम स्वाक्षरीसाठी आयुक्तांकडे पाठविण्यात आले आहे. उशीर झाला आहे; पण रक्कम मिळेल. सुरेश सोळसे, वित्त अधिकारी, मनपा.