आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव महापालिकेच्या मालमत्ता विक्रीचा होऊ शकतो निर्णय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव महानगरपालिकेवर असलेल्या कर्जाचा डोंगर उतरवण्यासाठी राज्य शासनाच्या मालकीच्या जागेवरचे गाळे विकण्याऐवजी महापालिकेच्या मालमत्ता विकण्याला प्राधान्य द्यावे, अशी सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनीही अनुकुलता दाखवली असल्याची माहिती आहे.

आयुक्त संजय कापडणीस यांच्या पुढाकाराने 10 सप्टेंबरला मुंबईत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महापालिकेचे कर्ज फेडण्यासंदर्भात विविध प्रस्तावांवर विचार करण्यात आला होता. त्या वेळी राज्याचे मुख्य सचिव जे.के. बंथिया यांनी राज्य शासनाच्या जागेवरील व्यापारी गाळे विकण्यापेक्षा महापालिकेने स्वत:च्या मालमत्तांचा लिलाव करावा, अशा तोंडी सूचना दिल्या, अशी माहिती समोर आली आहे. या बैठकीचे इतिवृत्त प्राप्त झालेले नसले तरी त्या वृत्ताला दुजोरा मिळतो आहे.

मुख्यमंत्री बोलावणार बैठक
विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या वतीने माजी आमदार डॉ.गुरुमुख जगवाणी यांनी नुकतेच एक निवेदन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिले. त्या निवेदनात खडसे यांनीही व्यापारी गाळे कर्जफेडीसाठी विकण्याला विरोध केला असून महापालिकेने तिच्या मालकीच्या भूखंडांचा लिलाव करून कर्जफेड करायला महापालिकेला सांगावे, असे आवाहन केले आहे. त्यावर अशा पद्धतीने महापालिकेच्या मालमत्ता विकून कर्ज फेडायला आपली हरकत नसल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली, असे डॉ. जगवाणी यांनी सांगितले.

या संदर्भात निर्णय घेण्यासाठी नगर विकास विभाग, महसूल विभाग, अर्थ विभाग, हुडको आणि जळगावचे व्यापार्‍यांची संयुक्त बैठक बोलवावी, असे निर्देश त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सचिवांना दिले, असेही डॉ. जगवाणी यांनी सांगितले. येत्या आठवडाभरात ही बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे.

तर व्यापार्‍यांना दिलासा
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार्‍या बैठकीत व्यापारी संकुलांऐवजी महापालिकेची मालमत्ता विकण्याचा निर्णय झाला तर बाजारभावाप्रमाणे रक्कम देण्यापासून संकुलांतील व्यापारी वाचू शकतात. अशा परिस्थितीत महापालिकेच्या मालकीच्या भूखंडांचा लिलाव करण्याचाही निर्णय होऊ शकतो. त्यानंतरही पैसे कमी पडले तर संकुलांतील व्यापार्‍यांकडून पुन्हा ‘प्रीमियम’ घेतला जाऊ शकतो, अशीही शक्यता आहे.