आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान्देश विकास आघाडीच्या मतांचा ‘राष्ट्रवादी’कडून पाठलाग

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव महापालिकेच्या 2008 साली झालेल्या निवडणुकीत मतांचा पाठलाग करणार्‍या राष्ट्रवादी पक्षाची दखल सत्ताधारी खान्देश विकास आघाडीला यावेळी अधिक गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. अन्यथा गेल्यावेळी एकूण मतदानात असलेला केवळ 15 हजार मतांचा फरक भरून काढणे राष्ट्रवादीला बरेचसे सोपे जाण्याची शक्यता आहे.

2008 मध्ये जळगाव शहर महापालिकेची निवडणूक झाली होती. त्यात पाच राजकीय पक्ष व प्रमुख तीन आघाड्यांच्या माध्यमातून अपक्षांसह 399 उमेदवारांनी भवितव्य आजमावले होते. यापूर्वीची निवडणूक खान्देश विकास आघाडी व शहर विकास आघाडीने एकत्रितरीत्या लढली. खाविआने 52 व शविआने 13 जागा लढवल्या. तसेच दोन्ही मिळून 40 उमेदवारांनी विजय मिळवला होता. त्या तुलनेत भारतीय जनता पक्षाने 59पैकी 9, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसने 63पैकी 14 जागांवर विजय मिळवला होता. त्यांच्या विजयी जागा कमी असल्या तरी मतांची संख्या मात्र वाढली होती.

मतांचा आलेख वाढला

खान्देश विकास आघाडीचा आणि शहर विकास आघाडीचा सर्वाधिक जागांवर विजय झाला असला तरी, पराभूत भाजप व राष्ट्रवादीच्या मतांचा आलेखदेखील काही कमी नव्हता.‘खान्देश’च्या सर्व उमेदवारांना 45 हजार 291 तर ‘शहर’च्या उमेदवारांना 12 हजार 858 मते मिळाली होती. केवळ खाविआचा विचार केला तर त्यांच्या तुलनेत भाजपच्या 59 उमेदवारांना 30 हजार 131, तर राष्ट्रवादीला तब्बल 38 हजार 389 मते मिळाली होती. काही वॉर्डांत झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजप व राष्ट्रवादीचे उमेदवार कमी फरकाने पराभूत झाले. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीच्या जागा कमी असल्या तरी, त्यांच्या मतांचा आलेख आगामी काळातील सत्ताधार्‍यांसमोरील आव्हान स्पष्ट करतो आहे.

निवडणुकीत कस लागणार

सात महिन्यांनी होणारी पालिका निवडणूक आमदार सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या सोबतीला शहर विकास आघाडी असेल असे आजचे चित्र असले तरी, ऐनवेळी ‘सोनवणे’ काय भूमिका घेतात, यावर पुढचे भवितव्य ठरेल. त्यामुळे जर-तरच्या गणितात खान्देश विकास आघाडीचा चांगलाच कस लागणार असून, त्यांच्यासमोर राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपचेही मोठे आव्हान राहणार आहे.

मनसे, कॉँग्रेसची भूमिका महत्त्वाची

गत निवडणुकीत 18 पैकी एका जागेवर विजय मिळवलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि 26 जागा लढवून एकही जागा मिळवू न शकलेल्या कॉँग्रेसच्या मतांचा आकडासुद्धा पाच हजारांपर्यंत पोहोचला होता. त्यातच सध्या दोन्ही पक्षांकडून सुरू असलेले मेळावे व कार्यक्रमांमुळे कार्यकर्त्यांमध्ये जोशपूर्ण वातावरण आहे. त्यामुळे कॉँग्रेस महापालिकेत संख्याबळ वाढवून निर्णायक भूमिका बजावण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

सर्वच निवडणुकांवर परिणाम

गेल्या मनपा निवडणुकीत मिळालेल्या मतांचा आलेख पाहता विजयासाठी किती मतांचा टप्पा गाठावा लागेल, याचा अभ्यास विविध पक्षांकडून सुरू झाला आहे. त्यात प्रभागरचनेनंतर कोणता भाग कोणत्या प्रभागाला जोडला जातो, यावरही अंदाज वर्तवले जात आहेत. विधानसभा व लोकसभा निवडणुकीत पक्षाला महापालिका निवडणूकीत मिळालेल्या मतांचा विचार व विजयासाठी कराव्या लागणार्‍या र्शमाचाही हिशोब करावा लागणार आहे.