आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Result And Political Crises

जळगाव : विरोधात बसण्याचे ‘मनसे’चे संकेत; सत्तेचे गाडे निर्णय प्रक्रियेत अडकले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेसाठी जळगावकरांनी दिलेल्या त्रिशंकू कौलामुळे सत्तेचे गाडे राजकीय निर्णय प्रक्रियेत अडकून पडले असून मैत्रीचा हात आधी कोणी पुढे करायचा, हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोधी बाकांवर बसावे, असे निर्देश राज ठाकरे यांनी त्यांच्या जिल्हाध्यक्षांसह नवनिर्वाचित नगरसेवकांना अंतर्गत बैठकीत दिल्याचे वृत्त असून खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश जैन मुंबईत तळ ठोकून बसले आहेत.
सत्तेसाठी खान्देश विकास आघाडीशी राष्ट्रवादी कॉँग्रेसचेच सूत जुळेल, असे चित्र स्पष्ट होत चालले आहे. मात्र, त्याबाबत जाहीरपणे बोलायला दोघांपैकी कोणीही पुढे यायला तयार नाही. खान्देश विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश जैन मंगळवारपासून मुंबईत तळ ठोकून बसले असून आजही ते परतले नाहीत. त्यांचा भ्रमणध्वनीही बंद आहे. तथापि, ते वैद्यकीय तपासणीसाठी मुंबईत गेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येते आहे.
दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिक येथे पदाधिकारी आणि नवनिर्वाचित नगरसेवकांना विरोधी बाकांवर बसण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे. जळगाव महापालिकेसंदर्भात पदाधिकार्‍यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले असले तरी अंतर्गत बैठकीत विरोधात बसण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त हाती आले आहे.

देवकरांना प्रतीक्षा निर्णयाची
आमदार गुलाबराव देवकर मंगळवारी मुंबईहून जळगावला परतले. आपली पक्षाध्यक्ष भास्कर जाधव आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून त्यांना जळगावची परिस्थिती सांगितली आहे. दोन दिवसांत आपण निर्णय कळवू असे त्यांनी सांगितले असून त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे, असे गुलाबराव देवकर यांनी स्पष्ट केले आहे.

कायदेशीर तरतुदींचा अभ्यास
दरम्यान, आघाडीला उघडपणे पाठिंबा न देता काही छुपा आणि अप्रत्यक्ष लाभाचा मार्ग काढता येईल का, याची चाचपणीही आघाडी आणि राष्ट्रवादीकडून सुरू असल्याचे संकेत आहेत. बहिष्कारासारखा शब्दप्रयोग करून मतदानात सहभागी न होण्याचा ‘मुंबई पॅटर्न’ राबविता आल्यास दोघांचीही प्रतिष्ठा सांभाळली जाईल, हे शक्य होते का, हे चाचपडून पाहिले जाते आहे. तसे झाले तर महापौर निवडीच्या सभेला उपस्थित राहूनही खान्देश विकास आघाडीचा महापौर निवडीला राष्ट्रवादी कॉँग्रेस अप्रत्यक्षपणे मदत करू शकते.

जळगाव । जळगाव पालिकेत कुणाला पाठिंबा असेल, पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर लवकरच भूमिका जाहीर करू, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक येथे म्हणाले असले तरी पक्षांतर्गत बैठकीत मात्र त्यांनी विरोधात बसण्याचे संकेत नगरसेवकांना दिले आहेत.
निवडणुकीमध्ये खाविआला सर्वाधिक मते असली तरी राष्टÑवादी, भाजप आणि मनसेच्या नावावरही काही प्रमाणात शिक्कामोर्तब केल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. जळगावमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणावर यश मिळालेल्या मनसेकडेच सत्तेच्या चावीचा दावेदार म्हणून पाहिले जात आहे. याच आनुशंगाने विजयी उमेदवारांशी राज ठाकरे यांनी नाशिकमध्ये संवाद साधला. त्यांच्या हस्ते विजयी उमेदवार विजय कोल्हे, सिंधू कोल्हे, ललित कोल्हे, मिलिंद सपकाळे, लीना पवार, संतोष पाटील, कांचन सोनवणे, पद्माबाई सोनवणे, मंगला चौधरी, खुशबू बनसोडे, पार्वताबाई भिल, नितीन नन्नवरे तसेच जनक्रांतीचे नगरसेवक सुमित्रा सोनवणे, सुनील पाटील त्याचप्रमाणे जिल्हा संपर्क अध्यक्ष म्हणून काम पाहणारे विनय भोईटे, गजानन राणे आणि आमदार प्रवीण दरेकर यांचा सत्कार केला. याप्रसंगी राज ठाकरे यांना महापालिकेच्या भूमिकेविषयी विचारले असता प्रथम त्यांनी बोलणे टाळले. मात्र पुन्हा यासंदर्भात माहिती विचारली असता त्यांनी सरचिटणीस दरेकर यांच्याकडून दोन दिवसांपूर्वीच माहिती घेतली असून ते जळगावला जाऊन आल्यानंतर आम्ही निर्णय जाहीर करू, असे सांगितले. जी भूमिका घेऊ ती जाहीरपणे घेऊ त्यात लपविण्यासारखे काहीच नसल्याचे स्पष्ट करीत जळगावमध्ये विकासकामे केल्यानंतर तिथे मोठा कार्यक्रम ठेवू, असे सूतोवाचही केले. तथापि, पक्षाच्या नगरसेवकांना त्यांनी सत्तेत सहभागाबाबत रस न दाखविता विरोधात बसण्याचेच संकेत दिले, असे काही नवनिर्वाचित नगरसेवकांनी सांगितले.

सर्वच पर्याय खुले : दरेकर
दरम्यान, यासंदर्भात राज ठाकरे यांच्या दौर्‍यात मनसे सरचिटणीस तथा आमदार प्रवीण दरेकर यांच्याशी संपर्क साधून जळगाव महापालिकेतील सत्तेविषयी विचारले असता अद्याप अंतिम चर्चा झालेली नसून सर्व पर्याय मनसेला खुले असल्याचे त्यांनी सांगितले. खान्देश विकास आघाडीला जनतेने निवडून दिले आहे. जनतेचा कौल विचारात घेऊनच मनसेही आपला निर्णय घेऊ शकतो, असे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले.

आम्ही तुम्हाला विचारतो का?
नगरसेवकांच्या सत्कार समारंभात जळगावहून आलेल्या एका पत्रकाराने तुम्ही जळगावला जादा सभा आणि बैठका का घेतल्या नाहीत, असा प्रश्न विचारला. त्यावर राज यांनी विनोदी शैलीत तुम्हाला विचारूनच सर्व करायचे का, असा प्रतिसवाल करीत आमचा पक्ष आहे सभा आणि बैठका कधी घ्यायच्या हे आम्ही ठरवू. तुम्हाला जाहिराती देतो तेव्हा पेपर छापणार का, असे कधी विचारतो का असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित करताच हंशा पिकला.