आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon Municipal Corporation Trees Cuting Issue

कारवाईत पाप: महापालिकेकडून अभियंत्याची पाठराखण, आयुक्तांकडूनही टाळाटाळच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- वृक्षतोड्यांवर धडाधड गुन्हे दाखल करणार्‍या महापालिका प्रशासनाने उद्यानातील 20 झाडांची कत्तल करणार्‍या अभियंत्याला पाठीशी घालण्याचे धोरण अवलंबले आहे. वृक्षतोडप्रकरणी नोव्हेंबर 2011 मध्ये जाकीर शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला पोलिस कोठडीची हवा खाव लागली होती. त्याच्याविरुद्ध तक्रार देणारा हाच अभियंता होता, ज्याच्यावर कारवाई करण्याऐवजी महापालिका आता कागदी घोडे नाचवित आहे. आयुक्तही कारवाईबाबत आदेश देत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

दिड वर्षापासून होणार्‍या वृक्षतोडीच्या घटनांवर सातत्याने प्रकाशझोत टाकत ‘दिव्य मराठी’ने प्रशासनाला खडबडून जागे केले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार देऊन न्यायालयात खटलेही दाखल केले. या घटनांमध्ये कारवाई करण्यासाठी पाऊले उचलणारे महापालिका प्रशासन मात्र आपल्याच अधिकार्‍यावर कारवाई करताना हात आखडते घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.

प्रशासनाच्या भूमिकेवर संशय : डांबर वितळविण्यासाठी 24 जानेवारीला कनिष्ठ अभियंता विजय मराठे यांनी शिवाजी उद्यानातील 20 जिवंत झाडांची कत्तल केली. त्याची स्पष्टपणे कबुली दिली. वृक्ष प्राधिकरण अधिकार्‍यांनी पाहणी केल्यानंतर वृक्षतोड झाल्याचेही स्पष्ट झाले. मराठे यांच्याविरुद्ध कारवाई होईल, असेही जाहीर केले. यासंदर्भातील प्रस्ताव पाठवूनदेखील अद्याप कारवाई झालेली नसल्याने या भूमिकेवरच संशय व्यक्त होत आहे.

वृक्षतोड्यांना मोकळे रान : वृक्षतोड रोखण्यासाठी आयुक्त गुन्हे दाखल करून खटला दाखल करण्याचे आदेश काढतात अन् दुसरीकडे आरोपींनी दंड भरण्याची तयारी दाखवताच खटला मागे घेतला जातो. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे शहरात कोणीही वृक्षतोड करेल आणि नंतर दंडाची रक्कम भरून सुटका करून घेईल. त्यामुळे वृक्ष वाचवण्याची संकल्पना कितपत साकार होईल.

कारवाईचा प्रस्ताव अडला कुठे? : वृक्षतोडीची पाहणी करून वृक्ष अधिकारी दिलीप सूर्यवंशी यांनी वृक्षतोडीला जबाबदार असणारे कनिष्ठ अभियंता मराठे यांच्याविरुद्ध उचित कारवाई व्हावी, असे अहवालात नमूद केले. तसा प्रस्ताव प्रभारी उपायुक्त प्रवीण पंडित यांच्याकडे सादर करण्यातही आला; पण त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अंतिम आदेश आयुक्त देत नसल्याने कारवाईचे नेमके घोडे अडले कुठे, याबाबत अधिकार्‍यांनीच चुप्पी साधली आहे.

अभियंत्यामुळेच जाकीरला कोठडी : शिवाजी उद्यानात शेख जाकीर शेख यासीन याला नोव्हेंबर 2011 मध्ये वृक्षतोड प्रकरणात अटक झाली होती. या प्रकरणात फिर्यादीची भूमिका खुद्द कनिष्ठ अभियंता विजय मराठे यांनीच बजावली होती. आज तेच मराठे त्याच शिवाजी उद्यानातील वृक्षतोडीच्या प्रकरणाला जबाबदार आहेत. मात्र, समान गुन्ह्यात अभियंत्यासाठी कागदी घोडे नाचविले जात आहेत. समान गुन्ह्यातील दोन घटनांमध्ये अभियंत्यावर कारवाई का नाही?

वेगळा न्याय कशासाठी? : सहा प्रकरणांमध्ये वृक्षतोडीच्या घटनेनंतर आठ ते 10 दिवसांत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र, पालिकेचा अधिकारी म्हणून 15 दिवस उलटूनही कारवाई होत नसल्याने एक सारख्या घटनांमध्ये वेगवेगळा न्याय कशासाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अदखल पात्र गुन्ह्याची तरतूद : वृक्षतोडीच्या घटनांमध्ये जबाबदार असणार्‍या व्यक्तींविरुद्ध पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल केला जातो. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम 1975 चे कलम 8 व 21 प्रमाणे तसेच भादंवि 427 प्रमाणे गुन्हा दाखल करता येतो.