आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१०० पैकी सापडले ७८ बोगस लाभार्थी घरकुल लाभार्थी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेच्या किरकोळ वसुली व‍िभागातील पथकाकडून शिवाजीनगरात घरकुल लाभार्थ्यांचे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. दुस-या दिवशी झालेल्या सर्वेक्षणात १०० पैकी ७८ बोगस लाभार्थी आढळले.
फक्त २२ घरकुलधारकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करत आपण लाभार्थी असल्याचे सिद्ध केले. दोन दिवसांत हाती आलेल्या आकडेवारीने बोगस लाभार्थ्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे निदर्शनास आल्याने प्रशासनही आवाक झाले आहे. सर्वेक्षणास वरोध झाल्यास किंवा अडथळा आणण्याचा प्रयत्न झाल्यास व्हिडिओ चित्राची तयारी महापालिका प्रशासनाने ठेवली आहे.
शहर झोपडपट्टी मुक्त करताना यातील गरिबांना हक्काची घरे मिळावी, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून पालिकेने शहरात साडेचार हजार घरकुले बांधली होती. एखाद्या भागातील झोपडपट्टी उठवल्यावर तेथील कुटुंबांना घरकुले वाटप करण्यात आली होती. मात्र, या सर्व प्रकरणात गैरव्यवहार झाला असून आवश्यकता नसलेल्यांनाही घरकुले दिली गेल्याचा आरोप केला जात होता. वाटप प्रक्रियेत मूळ लाभार्थी वंचित राहिले असून या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी घरकुलापासून वंचित राहिलेल्यांनी उपोषण केले होते. बोगस लाभार्थ्यांबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेत बुधवारपासून सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. गुरुवारी १०० घरकुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी केवळ २२ घरकुलधारकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करत आपण लाभार्थी असल्याचे सिद्ध केले. दोन्ही दिवसांतील सर्वेक्षणातून बोगस लाभार्थ्यांचे प्रमाण प्रचंड असल्याची आकडेवारी समोर येत आहे. बोगस लाभार्थ्यांचे प्रमाण असेच राहिल्यास शिवाजीनगरातील ७२४ घरकुलांपैकी केवळ २०० ते २५० मूळ लाभार्थी आढळून येतील, असा अंदाज आहे. १० दिवसांत सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाचे आहे. त्यानंतर १५ सप्टेंबर रोजी बोगस लाभार्थ्यांचे प्रमाण किती हे स्पष्ट होणार आहे.