आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षाची भूमिका स्पष्ट होताच राष्ट्रवादीचे नगरसेवक एकवटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जळगाव- सत्तेत सहभागी होणार की नाही, याबाबत मुंबईत बैठका सुरू असताना या चर्चेपासून कोसो दूर राहिलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक गुरुवारी प्रथमच एकत्र आले. उपमुख्यमंत्र्यांनी महापौरनिवडीत तटस्थ राहण्याचे आदेश दिल्यानंतर पक्ष कार्यालयात या नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. त्यात सोमवारी विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन दहा दिवस पूर्ण झाले आहेत. निकालानंतर सर्वाधिक जागा मिळवलेल्या खान्देश विकास आघाडीला कोणाचा टेकू मिळेल, यावर खल सुरू होता. तसेच भाजपने यापूर्वीच याबाबत आपली भूमिका स्पष्ट केल्याने विरोधी पक्षनेता भाजपचा होईल, हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा मनसे व राष्ट्रवादीकडे वळल्या होत्या. त्याचप्रमाणे आगामी राजकीय घडामोडी व गरज दृष्टिक्षेपात ठेवून राष्ट्रवादी खाविआसोबत जाईल, असा अंदाज बांधला जात होता. त्यामुळे राष्ट्रवादी खान्देश विकास आघाडीसोबत जाणार की बाहेरून पाठिंबा देणार, याबाबत थेट प्रदेशाध्यक्ष आणि अजित पवारांपर्यंत चर्चा सुरू होती. या प्रक्रियेपासून पक्षाचे 11 नगरसेवक मात्र अलिप्त होते. पक्षाच्या कोणत्याही नेत्याने त्यांच्याशी साधी चर्चाही केली नसल्याने व नगरसेवकांना गृहीत धरल्यामुळे नाराजीचा सूर निघत होता. तथापि, पक्षाने खाविआसोबत जाऊ नये म्हणून पक्षातील दुसरा गट सक्रिय होताच. अखेर नगरसेवकांमधील नाराजी दूर करण्यासाठी प्रय} सुरू असताना गुरुवारी दुपारी राष्ट्रवादीने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याची माहिती जळगावात येऊन धडकली. त्यानंतर नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. बैठकीला निरीक्षक रंगनाथ काळे, जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, महानगराध्यक्ष मनोज चौधरी उपस्थित होते.

विभागीय आयुक्तांकडे मनसेची गटनोंदणी
मनसेच्या नगरसेकांनी गुरुवारी विभागीय आयुक्तांकडे गटनोंदणीची प्रक्रीया पूर्ण केली. गटनेतेपदी ललित कोल्हे यांच्या नावाची नोंद असून त्यांनी काढलेला व्हीप पक्षातील इतर नगरसेवकांवर बंधनकारक राहणार आहे. या वेळी विजय कोल्हे, सिंधू कोल्हे, मिलिंद सपकाळे यांच्यासह नवनियुक्त नगरसेवक उपस्थित होते.