आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौर, उपमहापौर निवडीची आज घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिकेच्या तिसर्‍या निवडणुकीत स्पष्ट बहुमत नसले तरी सर्वाधिक जागा मिळवून सत्तेत आलेल्या खान्देश विकास आघाडीच्या महापौर व उपमहापौरांच्या बिनविरोध निवडीची घोषणा शुक्रवारी होणार आहे. दोन्ही पदांसाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक टळली असून निवडीची औपचारिकता बाकी आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात आयोजित सभेत निवडीचे सोपस्कर पार पाडले जातील. महापौरपदासाठी राखी श्यामकांत सोनवणे व उपमहापौरपदासाठी सुनील महाजन यांचे प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले आहेत. विरोधक राष्ट्रवादी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली आहे तर खाविआनंतर सर्वाधिक जागा मिळवलेल्या भारतीय जनता पक्षाने विरोधात बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापौरपदासाठीची चुरस राहिलेली नाही. पालिकेच्या दहाव्या महापौर म्हणून राखी सोनवणे ह्या पदभार स्वीकारतील.

विरोधी पक्षनेत्याकडे लक्ष
विरोधकांमध्ये सर्वाधिक जागा असलेल्या भाजपकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. भाजपकडून वामनराव खडके तसेच डॉ. अश्विन सोनवणे यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. त्याचप्रमाणे महानगराध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या सुरेश भोळे यांनीही प्रय} सुरू केल्याचे सांगितले जात आहे.

सभागृहनेतेपदी नितीन लढ्ढा, तर गटनेतेपदी चंद्रकात सोनवणे
खाविआच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत पालिकेच्या सभागृहनेता व गटनेता निवडीचे सर्वाधिकार सर्वानुमते आघाडीचे अध्यक्ष रमेश जैन यांना देण्यात आले होते. त्यानुसार सभागृहनेतेपदी नितीन लढ्ढा यांची, तर गटनेतेपदी चंद्रकांत सोनवणे यांची निवड करण्यात आली आहे. महापौरांची निवड झाल्याबरोबर या दोन्ही नावांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.