आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव: छेडछाड रोखण्यास शाळांमध्ये तक्रार पेटी, शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- छेडछाडीच्या घटना राेखण्यासाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अाता राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये तक्रारपेटी लावण्यात येणार आहे. तसा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. 
 
छेडखानीच्या प्रकरणात राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांच्या सहभागामुळे किंवा पाठिंब्यामुळे छळ करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात येत नाही. परिणामी, अल्पवयीन मुली किंवा शिक्षिकांवरील अत्याचारांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही बाब गंभीर असून, विद्यार्थी, पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वाईट प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी शिक्षण विभागाने राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांत तक्रारपेटी लावण्याचा आदेश काढला आहे. त्याची शाळा सुरू होण्यापूर्वी अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
 
अशी असेल पद्धत 
प्राथमिक,उच्च प्राथमिक, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांच्या दर्शनी भागात, प्रवेशद्वाराजवळ ही तक्रारपेटी लावण्यात येणार आहे. प्रत्येक आठवड्यात कामकाजाच्या शेवटच्या दिवशी मुख्याध्यापक, प्राचार्य, पोलिस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी आदींच्या समक्ष ती उघडावी लागणार आहे. ज्या ठिकाणी पोलिसपाटील उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी त्यांची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे. 
 
शाळांना सूचना 
- शाळांमधील छेडखानीसह विविध तक्रारी या माध्यमातून मांडता येणार आहेत. पुढील शैक्षणिक वर्षापासून त्यास सुरुवात होईल. यासंबंधीच्या सूचना सर्व शाळांना केल्या आहेत. डी.पी. महाजन, माध्यमिक शिक्षणाधिकारी 
 
तक्रारींची गंभीर दखल घेणार 
तक्रार पेटीत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची नोंद घेऊन तक्रार निवारण्यासाठी त्वरित दखल घेतली जाणार आहे. गंभीर आणि संवेदनशील स्वरूपाच्या तक्रारींबाबत पोलिसांचे साहाय्य घेण्यात येणार आहे. तक्रारकर्त्यांचे नाव गुप्त ठेवून कारवाई करण्यात येणार आहे. महिला शिक्षक, विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारी महिला तक्रार निवारण समितीसमोर ठेवण्याचे नियोजन आहे. 
बातम्या आणखी आहेत...