आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Jalgaon, Twelth Examination Question Papers

बारावीचे प्रश्‍नपत्रिका महाविद्यालय, पोस्ट कार्यालयात पडून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बारावीच्या परीक्षा सुरू होऊन सात दिवस झाले. मात्र, ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशनच्या (जुक्टो) शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारल्याने काही ठिकाणी महाविद्यालयात तर काही ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्येच पेपरचे गठ्ठे पडून आहेत. यावर लवकर तोडगा न निघाल्यास बारावीचा निकाल लांबणीवर पडेल. जिल्ह्यातील 1200 कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आंदोलनात सहभागी झाले आहेत.


मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही हवेत
अनेक वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयांचे शिक्षक विविध मागण्या राज्य सरकारकडे करीत आहेत. मात्र, शासन लक्ष देत नसल्याने गेल्या वर्षी ऐन बारावी परीक्षेच्या काळात आंदोलन सुरू केल्याने त्यांना लेखी आश्वासन देण्यात आले. मात्र ते अजूनही पाळले नाही. जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा आंदोलनाचे अस्त्र उगारले होते. त्यानंतर 5 फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांनी मागण्या पूर्ण करून पंधरा दिवसात अध्यादेश काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तेही पूर्ण न झाल्याने आंदोलन सुरू केले आहे.


निकाल लांबण्याची शक्यता
पेपर झाल्यावर तिसर्‍या दिवशी तपासनिसाच्या हातात पेपर पडतात. मात्र, बारावीची परीक्षा सुरू होऊन सहा दिवस उलटले तरीही पेपर तपासणीला सुरुवात झालेली नाही. चाळीस गुणांचा पेपर तपासायला आठ दिवस आणि शंभर गुणांचा पेपर तपासायला बारा दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे संपावर तत्काळ तोडगा काढला नाही तर निकाल लांबणार आहे.


असा होतो पेपरचा प्रवास
परीक्षा झाल्यानंतर पेपर जिल्ह्याच्या कस्टडीत ठेवले जातात. त्यानंतर स्पीड पोस्टाद्वारे ते संबंधित मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांकडे पाठविले जातात. त्यानंतर संबंधित पेपर तपासणार्‍या शिक्षकाकडे ते पेपर दिले जातात. त्यानंतर ते पेपर तपासून दहा दिवसांच्या आत मॉडरेटरकडे दिले जातात. त्यानंतर चीफ मॉडरेटरकडे पेपर दिले जातात. 15 दिवसांच्या आत निकालाची प्रक्रिया पूर्ण करतात. परीक्षा झाल्यानंतर 45 दिवसांच्या आत निकाल लावण्याचे सर्वोच्च् न्यायालयाचे आदेश आहेत.


मुख्यमंत्री आश्वासन पाळत नाहीत. दोन वर्षांपासून आमचा अनुभव आहे. मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. मात्र, शिक्षण विभाग त्याची अंमलबजावणी करीत नाही. लोकसभा निवडणुकांची कामे लागल्यानंतर निकाल लांबणीवर पडल्यास सरकारने आम्हाला जबाबदार धरू नये. डी.डी.पाटील, विभागीय अध्यक्ष, ज्युक्टो.


या आहेत मागण्या
0 पाचवा वेतन आयोग 1 जानेवारी 1996 पासून मिळावा
0 त्रिस्तरीय वेतन-र्शेणी लागू करावी
0 संपकाळातील 42 दिवसांचे वेतन मिळावे
0 वर्गातील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत शिथिलता आणावी