आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमींना मदत केल्यास मिळणार रोख पारितोषिके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी राज्यभरात 13 हजार नागरिकांचा मृत्यू होतो, तर सुमारे 45 हजार नागरिक जखमी होतात. दरम्यान, अपघात झाल्यानंतर जखमींना मदत करणारे नेहमीच पडद्याआड असतात. त्यामुळे शासनाने जखमींना मदत करणार्‍या जागरूक व दक्ष नागरिकांचा रोख पारितोषिके देऊन सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.


महामार्गाचे चौपदरीकरण होत आहे. त्याचबरोबर वाहतुकीच्या नियमांबाबत सातत्याने जनजागृतीही होत असून, महामार्गावर सूचनांचे फलक-रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत. त्यानंतरही अपघातांचे प्रमाण घटलेले नाही. त्यातच अनेक जण मद्यप्राशन करून वाहने चालवत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपघातांमुळे दरवर्षी 13 हजार नागरिकांचा मृत्यू होऊन सुमारे 45 हजार नागरिक जखमी होतात. अनेक वेळा जखमींना वेळेवर मदत मिळत नाही. त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो किंवा त्यंना कायमचे अपंगत्व येते. त्या पार्श्वभूमीवर अपघातानंतर जखमींना मदत करणार्‍या संस्था, समूह वा व्यक्तींना गौरवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसा अध्यादेश मंगळवारी काढण्यात आला. जखमींना मदत करणार्‍यांना दीड लाख, एक लाख, पन्नास हजारांचे अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक देण्यात येईल. पुरस्कारांसाठी जिल्हा पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस अथवा पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेचे मुख्य अधिकारी शासनाला प्रस्ताव सादर करतील.


समिती घेईल निर्णय
जानेवारी ते डिसेंबर या काळात असे प्रस्ताव स्वीकारले जातील. त्यानंतर पुढील वर्षाच्या मार्चअखेरपर्यंत त्यावर समिती निर्णय घेईल. त्यासाठी एक समिती गठीत करण्यात येईल. या समितीचे अध्यक्ष गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव, तर गृहसचिव, वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक, सहसचिव व उपसचिव हे सदस्य राहणार आहेत.


वेळेवर मदतीची गरज
अपघात झाल्यानंतर मृत किंवा जखमींना तातडीने मदतीची गरज भासते. त्यात केवळ अपघातस्थळावरून रुग्णालयात नेण्याइतपत मदत अपेक्षित नसते, तर रुग्णालयातही रक्त देण्यासह आणखी इतर अर्ज भरण्यासाठी मदतीची गरज असते. अपघातात जखमींचे नातेवाईक सोबत नसतात. त्यामुळे त्यांचे पत्ते शोधणे, अपघाताचे वृत्त संबंधितांना देणे आणि वेळ पडल्यास जिथे मृत किंवा जखमी राहत असेल, तिथपर्यंत जाण्याची तयारी ठेवणे हेही यात मोडते.