आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Bhusawal Bus Depot ,Divya Marathi

भुसावळ आगाराला दरमाहा 50 लाखांचा भुर्दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - राज्य परिवहन महामंडळाच्या भुसावळ बस आगाराला 50 बसेससाठी दरमहा सरासरी 1 लाख 20 हजार लिटर इंधन लागते. मात्र, गेल्या वर्षापासून इंधन कंपन्यांनी महामंडळाला लागणार्‍या इंधनावरील सबसिडी बंद केली. या मुळे महामंडळाला प्रतिलिटर 10 रुपये 76 पैसे जास्त मोजावे लागत होते.
आधीच कमी उत्पन्नामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या भुसावळ आगाराची चिंता या प्रकारामुळे वाढली. यावर पर्याय म्हणून महामंडळाने प्रतिलिटर 10 रुपये 76 पैसे जास्त मोजण्यापेक्षा खासगी पंपावरून डिझेल भरण्याचा निर्णय घेतला. यानुसार भुसावळ आगाराच्या सर्व बसेस सद्य:स्थितीत महामार्गावर असलेल्या आठ किलोमीटर अंतरावरील (दोन्ही बाजूने) पंपावरून डिझेल भरतात.
हा आहे योग्य उपाय
भुसावळ आगारातील 50 बसेस शहराबाहेर महामार्गावर असलेल्या खासगी पंपावर इंधन भरण्यासाठी जातात. यामुळे आगाराला दररोज किमान 200 लीटर डिझेल अतिरिक्त लागते. महामंडळाने प्रवासादरम्यान महामार्गावर असलेल्या पंपांवरून इंधन भरल्यास आठ किलोमीटर अंतरावर विनाकारण होणारा खर्च वाचवता येईल. शिवाय वेळेची बचत होईल. वर्षभर आठ किलोमीटर अंतरासाठी डिझेलवर खर्च होणारे 50 लाख रुपये वाचल्यास वार्षिक तोटा कमी येईल. यानुषंगाने विचार होणे आजमितीला गरजेचे आहे.
आठ किलोमीटरचा फेरा कायम
खासगी पंपावरून इंधन भरल्याने भुसावळ आगाराचे वर्षभरात सुमारे 12 कोटी रुपये वाचले. मात्र, यासाठी दोन्ही बाजूने आठ किलोमीटर अंतर कापणे अपरिहार्य ठरले. या फेरीतून आगाराला एक रुपयाचे उत्पन्न मिळत नसले तरी निव्वळ आठ किलोमीटर अंतरासाठी सर्व बसेस मिळून वर्षभर जवळपास 50 लाख रुपयांचे डिझेल खर्ची पडले.
आमदनी अठन्नी, खर्चा रुपय्या
वर्षभराच्या कालावधीत भुसावळ बस आगाराला दरमहा सरासरी 1 कोटी 20 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यासाठी होणार्‍या बसफेर्‍यांना दरमहा 1 लाख 20 हजार लीटर डिझेल (75 लाख रुपये) लागते. याशिवाय इतर खर्चाची तुलना करता आगाराची स्थिती आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपय्या, अशी होते. या मुळे आगाराला सर्व मिळून दरमहा 40 लाखांचा तोटा सहन करावा लागतो.
विनाकारण होणारा खर्च थांबवल्यास वार्षिक तोटा होईल कमी
डबघाईला आलेल्या महामंडळाने बचतीसाठी खासगी पेट्रोल पंपाचा आधार घेतला आहे. मात्र, भुसावळ आगारातून इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जाताना प्रत्येक बसला आठ किलोमीटरचे अंतर कापावे लागते. यासाठी भुसावळ आगाराला वर्षभरात तब्बल 50 लाख रुपयांचे अतिरिक्त डिझेल खरेदी करावे लागले.
बचतीचा नेहमीच प्रयत्न करतो
आगारातील अतिरिक्त खर्च टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. दैनंदिन प्रवासासाठी लागणार्‍या इंधनाची बचत कशी करता येईल यालाही प्राधान्य देण्यात येत आहे. प्रवासीसंख्या वाढल्यास अडचणी कमी होतील. भुर्दंड बसणार नाही, यानुषंगाने प्रयत्न केले जातील. महामंडळाच्या धोरणानुसार बसगाड्यांमध्ये इंधन भरण्याच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे. टी.पी.पाटील, आगारप्रमुख, भुसावळ.