आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, BJP, Nationalist Congress, Eknath Khadse

भुसावळच्या भाजपात नाराजीची धुळवड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - माजी प्रभारी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अनिल चौधरी यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाला भुसावळच्या 25 कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला असून, प्रदेशाध्यक्षांकडे फॅक्सने राजीनामा पाठवला आहे. जिल्हाध्यक्षांसह एकनाथ खडसे यांनाही रविवारी राजीनाम्याच्या प्रती देण्यात आल्या आहेत. शहराध्यक्ष रमण भोळे यांच्या लेटर हेडवर सामूहिक राजीनामा पाठवण्यात आला आहे.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना विश्वासात न घेता चौधरींना भाजपात प्रवेश दिला जात असल्याने राजीनामा देत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.राजीनामा देणार्‍यांमध्ये अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष रऊफ खान, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुनील नेवे, मुन्ना तेली, शहराध्यक्ष रमण भोळे, उपाध्यक्ष शेख शफी, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस परीक्षित बर्‍हाटे, शहर सरचिटणीस गिरीश पाटील, नगरसेवक वसंत पाटील, राहुल मकासरे, प्रमोद नेमाडे, रमेश नागरानी, अजय पाटील, नगरसेविका हेमलता इंगळे, भावना पाटील, दीपाली बर्‍हाटे, शोभा नेमाडे, शैलजा नारखेडे, वासंती इंगळे, माजी नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे आदींचा समावेश आहे. मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवर कार्यकर्त्यांनी खडसेंची भेट घेऊन राजीनामे सुपूर्द केले.


गटनेत्यांचे ‘एकला चालो रे’ : भुसावळ पालिकेत भाजपचे 11 नगरसेवक त्यापैकी 10 जणांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. मात्र, गटनेते तथा जिल्हा सरचिटणीस अजय भोळे हे या प्रकारापासून चार हात लांब आहेत. गेल्या चार दिवसांपासून अनिल चौधरींच्या संभाव्य प्रवेशाला स्थानिक पदाधिकार्‍यांकडून सातत्याने विरोध दर्शवला जात असतानाही भोळे यांनी मात्र, ‘एकला चालो रे’चे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे भविष्यात त्यांच्या गटनेते पदावर गंडांतर येऊ शकते, या चर्चेला आता नव्याने तोंड फुटले आहे.


यावललाही राजीनामा सत्र : यावल येथेही 28 पदाधिकार्‍यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यात नगरसेवक उमेश फेगडे, माजी नगराध्यक्षा माधुरी फेगडे, देवराम राणे, पौर्णिमा फालक, तालुका उपाध्यक्ष किशोर चौधरी, नगराध्यक्षा नीलिमा जंगले आदींचा समावेश आहे.


काय म्हणाले एकनाथ खडसे : राजीनामे द्या, परंतु पक्षाचे काम ताकदीने करा. अपप्रवृत्तीची माणसं वातावरण गढूळ करत आहेत. पक्ष माझ्याच बाजूने आहे. ज्यांची ग्रामपंचायत निवडणूक जिंकून येण्याची लायकी नसते, ते आता मला राजकारण शिकवू लागले आहेत.


संघर्ष आम्ही करतो व हनीमून ते करतात. गेली 25 वर्षे मेहनतीच्या जोरावर राजकारण करत आहे. कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. तसे केले असते तर अशोक कांडेलकर कधीच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले नसते. स्मिता वाघ यांना अध्यक्ष केले नसते. खुल्या जागेवर राजेंद्र गुरचळ यांना भुसावळ पंचायत समितीचे सभापती केले. विरोधकांचे भाजपात फूट पाडण्याचे हे षड्यंत्र आहे. कोणीच पक्ष सोडणार नाही.