आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, CCTV Camera, Police Force, Divya Marathi

शहरातील हालचालींवर सीसीटीव्ही व्हॅन ठेवणार बारकाईने लक्ष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गर्दी, आंदोलन, मोर्चांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस दलाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत 6 विशेष सीसीटीव्ही व्हॅन तयार केल्या आहेत. यावर प्रत्येकी दोन लाखप्रमाणे 12 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.


शहर व गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी पोलिस दलातर्फे सीसीटीव्हीप्रणाली बसवलेल्या व्हॅन तयार करण्याचे काम सुरू होते. तीन दिवसांपूर्वी यातील दोन व्हॅन तयार होऊन पोलिसांच्या ताब्यात मिळाल्या आहेत. तर येत्या 15 दिवसांत चारही उर्वरित व्हॅन मिळणार आहेत. अपघात, सोनसाखळी चोरी, भुरट्या चोर्‍या या कॅमेर्‍यात कैद झाल्यास गुन्हेगार शोधण्यास मदत होईल. शिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे गर्दीमधूनही एखादा उपद्रवी चेहरा शोधण्यासाठी फायदा होईल. या विशेष व्हॅन जिल्ह्यातील काही तालुक्यांतही पाठवण्यात येणार आहेत. पोलिस अधीक्षक एस.जयकुमार यांनी चार महिन्यांपासून सीसीटीव्हीसंदर्भात तयार केलेल्या आराखड्यास मूर्त स्वरूप येण्यास सुरुवात झाली आहे.


व्हॅनमध्ये स्क्रीन : समोर सुरू असलेल्या नेमक्या घडामोडी टिपण्यासाठी व्हॅनचालकाच्या शेजारच्या सीट समोर कंट्रोल पॅनल आहे. त्यामुळे शेजारी बसलेली व्यक्ती आवश्यकतेनुसार कॅमेर्‍याची दिशा आणि अंतर बदलू शकते.

पीटीझेड प्रकारचा कॅमेरा : या व्हॅनवर पीटीझेड (पॅन टिल्ट अँण्ड झुम) या प्रकारचा कॅमेरा आहे. हा कॅमेरा 360 अंशात फिरतो. त्यामुळे पाठीमागच्या हालचाली टिपता येतात. 100 मीटर दूर अंतरावरील व्यक्ती किंवा वाहनाची नंबरप्लेट झूम करून ओळखणे शक्य होते.


जास्त क्षमतेचा डीव्हीआर : एकदा कॅमेरा सुरू केल्यानंतर 240 तासांचे रॅकॉर्डिंग सेव्ह करणारे डी.व्ही.आर.मशीन आहे. त्यामुळे निरंतर 10 दिवस कॅमेरा सुरू ठेवला तरी संपूर्ण रेकॉर्डिंग होऊ शकते.


जीपीएस : सीसीटीव्हीशिवाय व्हॅनवर जीपीएस सिस्टिम बसवल्यामुळे व्हॅन कोणत्या परिसरात आहे. हे कंट्रोल रुममध्ये कळणार आहे.


आयआर : रात्रीच्या वेळी चित्र टिपण्यासाठी कॅर्म‍यात आयआर (इंन्फ्रारेड रेस) सिस्टिम आहे. त्यामुळे अंधाराच्या जागेवरही स्पष्ट रेकॉर्डिंग उपलब्ध होईल.


थ्रीजी स्लॉट : यामुळे व्हॅनच्या कॅमेर्‍यात सुरू असलेल्या हालचाली थेट पोलिस अधीक्षकांच्या दालनातील टीव्हीत दिसू शकतील.

गैरप्रकारांवर लक्ष
सुरक्षिततेच्या उद्देशाने या विशेष व्हॅन तयार केल्या आहेत. राज्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. शहरात, जिल्ह्यात होणार्‍या अनेक घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी या वाहनांचा उपयोग होईल. एस.जयकुमार, पोलिस अधीक्षक


दोन व्हॅन सज्ज
पोलिस दलाने मागणी केल्याप्रमाणे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्या दोन व्हॅन तयार आहेत. तर उर्वरित 4 व्हॅन 15 दिवसांत तयार होतील. विक्रांत सराफ, तांत्रिक सहायक