आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलेक्टर, सायंटिस्ट होऊनही त्यांचे पाय जमिनीवरच!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आईसोबत राजेंद्र भारूड - Divya Marathi
आईसोबत राजेंद्र भारूड

शिरपूर/साक्री -गावातल्या भिल्ल वस्तीत दारू विकणा-या अशिक्षित आईचा मुलगा कलेक्टर होतो. त्यानंतरही तो आपले गाव, आपल्या माणसांना न विसरता आवर्जून गावी येतो अन् काहीतरी करण्याची जिद्द बाळगतो... त्यांचे नाव आहे आयएएस राजेंद्र बंडू भारूड (रा. सामोडे, ता. साक्री). अशाच एका आईच्या प्रेरणेने मोठे झालेले सायंटिस्ट डॉ. छगन तेले... एम.एस्सीत पुणे विद्यापीठात प्रथम आल्यानंतर सायंटिस्ट झाले. अमेरिकेत राहिले आणि आता आपल्या गावी थाळनेर (ता.शिरपूर) येथे शैक्षणिक संस्था स्थापन करून वयाच्या 67व्या वर्षी एका नव्या पर्वाला सुरुवात करत आहेत.


मला पैशाने नव्हे, तर कार्यातून श्रीमंत व्हायचंय


आईची इच्छा आणि स्वत:च्या परिश्रमातून डॉक्टर आणि त्यानंतर आयएएस झालेले डॉ. राजेंद्र भारूड हे प्रशिक्षणाचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर रविवारी आपल्या गावी आठ दिवसांच्या मुक्कामासाठी आले आहेत. भिल्ल वस्तीतील आपले गाव आणि माणसांना ते सहज भेटत आहेत. त्यांनाही भेटणा-यांची गर्दी आहे. अत्यंत साधी राहणी असलेले भारूड एकत्रित कुटुंबात म्हणजे भाऊ व वहिनीसोबत राहतात. अहिराणी, भिलोरी भाषेत ते आप्तेष्टांशी संवाद साधतात. लोकांना समजून घेणं आणि समजावून सांगणं त्यांना आवडतं. गाव आणि समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे त्यांचे ध्येय आहे. पैशापेक्षा कार्याने त्यांंना श्रीमंत व्हायचं आहे.