आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Dietician Advise, Mahashivratri

थंडीतल्या उपासाला फलाहार, आहार तज्‍ज्ञांचा सल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - तीन दिवसांपासून होणारी गारपीट आणि पावसामुळे वातावरण कमालीचे बदलले असून, अचानक गारवाही वाढला आहे. अशा वातावरणात उपवासाचे जड पदार्थ सेवन केल्यास आरोग्यास ते हानिकारक ठरतात. त्यामुळे या काळात फलाहाराला प्राधान्य देण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.


हवामानात अचानक बदल झाल्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढले आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या परीक्षाही सुरू आहेत. त्यामुळे ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी आहारतज्ज्ञांशी बोलून महाशिवरात्रीचा उपास करताना काय काळजी घ्यायची, ही माहिती आम्ही उपलब्ध करून दिली आहे.


कमी आहारात जास्त कॅलरीज
दररोज भाजी, दोन पोळय़ा व वरणभात या जेवणातील आहारापासून जितक्या कॅलरीज् मिळतात, त्यापेक्षा दीडपट अधिक उपवासाच्या पदार्थांपासून मिळतात. कारण साबुदाणा, शेंगदाणे आणि तुपासारख्या पदार्थांमध्ये कॅलरीचे प्रमाण जास्त असते. साबुदाणा, शेंगदाण्याचे कूट, तूप व बटाटा यापासून बनवलेल्या एक वाटी साबुदाणा खिचडीतून 325 ते 350 ग्रॅम कॅलरी, तर शेंगदाण्याच्या एक वाटी आमटीतून 150 ते 180 ग्रॅम कॅलरी शरीरात जाते. पाऊस आणि थंडीच्या वातावरणात असे पदार्थ पचायला जड जातात आणि त्यामुळे आधी पोट आणि नंतर संपूर्ण आरोग्य बिघडते.


हे पदार्थ ठरू शकतात पर्याय
गूळ टाकून केलेला राजगिर्‍याचा शिरा हा उत्तम पर्याय आहे. कारण गूळ टाकून केलेला कोणताही पदार्थ गार वातावरणात शरीराला उपयुक्त असतो. तसेच काहीतरी वेगळी चव चाखायची असल्यास योगर्टसुद्धा उत्तम पर्याय आहे. योगर्टमध्ये सफरचंद, द्राक्षे, स्ट्रॉबेरीसारखी गरयुक्त फळे दही टाकून मिक्सरमध्ये एकत्रित करून घ्यावी. त्यात चवीनुसार मीठ व साखर टाकावी. हा पदार्थदेखील आरोग्यास चांगला आहे.

हे पदार्थ खाऊ नयेत
ढगाळ वातावरणात अधिक कॅलरीज असलेल्या पदार्थांचे सेवन करू नये. बटाटे, साबुदाणा, रताळे, भगर, शेंगदाणे हे पदार्थ टाळायला हवेत. फळांचा वापर करताना पाणीयुक्त फळे, काबरेहायड्रेट आणि फॅट असलेले पदार्थ खाऊ नयेत.


या पदार्थांचे करावे सेवन
राजगिर्‍याच्या लाह्या, लाडू, सर्व प्रकारची गरयुक्त फळे, गरम दूध, ताक, सुकामेवा, काळ्या मनुका, खजूर यांचे सेवन करावे. राजगिरा पचनाला खूप हलका असतो. त्यामुळे शरीराला दिवसभर थोडी-थोडी ऊर्जा मिळते.


उपासात हलका आहार घेणेच योग्य
उपासात हलका आहार घेणेच योग्य ठरते; परंतु आपल्याकडे त्याउलट स्थिती आहे. भरपूर कॅलरीज असलेल्या पदार्थांचाच वापर उपासात केला जातो. त्यामुळे शरीराला आराम मिळण्याऐवजी पोट अधिकच भरल्यासारखे वाटते व पचनक्रियेवर ताण पडतो. अधिक कॅलरीज, काबरेहायड्रेट आणि फॅट असलेले पदार्थच उपासात खाल्ले जातात. ढगाळ वातावरणात फलाहारावर भर द्यावा. दीपाली लोढा, आहारतज्ज्ञ