आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी खासदारांनी केला खड्डय़ांचा पंचनामा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - यावल-रावेरकडून भुसावळमध्ये प्रवेश केल्यावर वनविभागाचा तपासणी नाका ते महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत (सुमारे 1 किलोमीटर)च्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे.
या रस्त्यावर दोन्ही बाजूने 12 फूट लांबी आणि तेवढेच रुंद व दीड ते दोन फूट खोलीचे खड्डे जागोजागी पडले आहेत. जळगाव व जामनेरकडून येणारी वाहने मध्य प्रदेशकडे जाताना भुसावळातील या रस्त्यावरून जातात. मात्र, अवघ्या एक किलोमीटर अंतराच्या या खड्डेमय रस्त्यामुळे त्यांची हाडे खिळखिळी होतात. खड्डय़ांमुळे तयार झालेल्या उंच-सखल भागामुळे वाहनांचे नुकसान होते. अवजड वाहनांचा समतोल ढासळून अपघात होऊ शकतो. लहान वाहनांना तर सापशिडीच्या खेळाप्रमाणे हे खड्डे चुकवावे लागतात.

रविवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात एका रिक्षातून रस्त्यावर पडलेला बालक बचावला. हा प्रकार या रस्त्याने जाणार्‍या खासदार जावळे यांच्या निदर्शनास आला. त्यानंतर त्यांनी भुसावळ विर्शामगृहात रस्ते दुरुस्त का होत नाहीत? याबाबत सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता एस.यू.कुरेशी यांच्याकडून माहिती घेतली. त्यावर त्यांनी पालिका साधे खड्डे बुजवण्यासाठीसुद्धा एनओसी देत नसल्याचे स्पष्ट केले. पालिकेतील भाजपचे गटनेते प्रमोद नेमाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, अभियंता कुरेशी आदी उपस्थित होते.

पालिकेकडून एनओसी मिळाली नाही
यावल रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी परवानगी द्या, अशी विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाने पालिकेला केली होती. मात्र, नगरपालिकेने आम्हाला एनओसी देण्यास नकार दिला. एस.यू.कुरेशी, शाखा अभियंता, बांधकाम विभाग, भुसावळ

मुख्याधिकारी इसारा रकमेवर अडले
यावल रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मुख्याधिकार्‍यांना 2 जूनला आदेश दिले होते. निविदा येईपर्यंत किमान पॅचवर्क तरी करा, असे सांगितले. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. ते ठेकेदारांकडून अडीच टक्के इसारा रकमेवर अडून बसल्याने काम खोळंबले आहे. उमेश नेमाडे, नगराध्यक्ष, नगरपालिका, भुसावळ
तर खड्डय़ात उपोषण
भुसावळची बाजारपेठ यावल-रावेर तालुक्यावर अवलंबून आहे. ज्या तालुक्यांमुळे शहराच्या अर्थचक्राला हातभार लागतो, त्या तालुक्यांतून येणार्‍या नागरिकांचा भुसावळातील प्रवेश खड्डेमय रस्त्यावरून होतो. यावल रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आपण स्वत: या खड्डय़ात उपोषणाला बसू. प्रसंगी रस्ताही बंद करण्यात येईल. हरिभाऊ जावळे, माजी खासदार
टेप घेऊन मोजमाप
माजी खासदार जावळे यांनी टेप घेऊन यावल रस्त्यावरील मोठय़ा खड्डय़ाचे मोजमाप केले. जागोजागी पडलेले खड्डे चुकवताना वाहनचालकांची उडणारी त्रेधातिरपीट पाहून जिल्हाधिकार्‍यांशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली. सार्वजनिक बांधकाम विभाग खड्डे बुजवण्यास तयार असताना पालिकेची एनओसी का मिळत नाही? अशी विचारणाही केली. त्यानंतर त्यांनी सर्वात मोठा खड्डा खडी टाकून बुजवून घेतला.
यावल रोडवर पडलेल्या खड्डय़ांची माजी खासदार जावळे यांनी टेपने मोजणी केली. तसेच गॅरेजजवळील मोठय़ा खड्डय़ात स्वत: बाजूला पडलेला मुरूम टाकला.
अवजड वाहनांना अपघाताचा धोका
वनविभागाच्या तपासणी नाक्याकडून शहरात येताना एका गॅरेजजवळ तब्बल 12 फूट लांबी आणि तेवढय़ाच रुंदीचा भलामोठा खड्डा पडला आहे. या खड्डय़ाची खोली तब्बल दीड फूट असल्याने त्यातून वाहन बाहेर काढणे दिव्यच ठरते. रस्त्याच्या मधोमध पडलेला हा खड्डा चुकवताना अनेक वाहने दुभाजकाला घासली जातात. बंद पथदिव्यांमुळे खड्डय़ांचा अंदाज न आल्यास रात्री जीवघेणा अपघात होऊ शकतो. तरीही पालिका गंभीर नाही.
चालकांची कसरत
रस्ता दुरुस्त न केल्यास उपोषण करण्याचा जिल्हाधिकार्‍यांना दिला इशारा
भुसावळातील यावल रोडवर जागोजागी पडलेल्या खड्डय़ांमुळे रिक्षातून पडलेला एक बालक रविवारी सुदैवाने बचावला. या वेळी या रस्त्याने जाणारे माजी खासदार हरिभाऊ जावळे यांनी हा प्रकार पाहिला. जीवघेणे खड्डे चुकवताना होणारा त्रास व अपघातांचा वाढलेला धोका पाहता त्यांनी हातात टेप घेऊन खड्डय़ांचे मोजमाप केले. तसेच आठवडाभरात रस्ता दुरुस्त न केल्यास या खड्डय़ात उपोषणाला बसू, असा इशाराही जिल्हाधिकार्‍यांना दिला. याची शहरात चर्चा सुरू होती.