आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Eknath Khadse,Anil Chaudhari, BJP,Divya Marathi

भुसावळनंतर जळगावातही राजीनामानाट्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - भुसावळ येथील अनिल चौधरींच्या प्रवेशाच्या मुद्यावरून भाजपांतर्गत राजकारण चांगलेच तापले आहे. त्याचाच भाग म्हणून भुसावळनंतर जळगावातील नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी एकनाथ खडसेंच्या निर्णयाला पाठिंबा देत राजीनामे दिले. स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता चौधरींना भाजपात प्रवेश देण्यास कार्यकर्त्यांनी विरोध केला. याच मुद्यावर खडसेंच्या राजीनाम्याची अफवा पसरताच ‘मुक्ताई’ बंगल्यावर गर्दी झाली होती.


>भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या भाजपातील प्रवेशावरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चौधरींना पक्षात प्रवेश देण्यावरून मतभिन्नता आहे. त्यातच गेल्या 15 वर्षांपासून चौधरींविरोधात लढणार्‍या भाजपाच्या भुसावळातील पदाधिकार्‍यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या अस्वस्थतेचा स्फोट रविवारी दुपारी पाहायला मिळाला. या वेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी प्रमुख पदाधिकार्‍यांना बोलावून घेतले. त्यांच्या बंगल्यावर दुपारी 3 वाजेच्या सुमारास प्रदेश सहसंघटनमंत्री डॉ.राजेंद्र फडके, जिल्हा संघटनमंत्री अँड.किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, खासदार ए.टी.पाटील, खासदार हरिभाऊ जावळे, नगरसेवक संजय राणे आदींची बैठक झाली. त्यात अनिल चौधरींना प्रवेश देण्याबाबत चर्चा झाली. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता, त्यांच्याशी चर्चा न करता त्यांना पक्षात प्रवेश देणे चुकीचे होईल, असे सांगत आताच या प्रवेशाला माझा विरोध असल्याची भूमिका खडसेंनी घेतली. दरम्यान, यासंदर्भात जिल्हाध्यक्ष वाघ यांनी खडसेंच्या भावना प्रदेश पातळीवर कळवल्याचे सांगण्यात आले.पदाधिकार्‍यांची बैठक झाल्यानंतर मुक्ताई बंगल्यावरून जात असताना खडसे यांच्याशी संवाद साधून त्यांना निरोप देताना कार्यकर्ते.


पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय घेऊ नये
मी अनेक वर्षांपासून अपप्रवृत्तींविरुद्ध लढतोय. भाजपात अपप्रवृत्तींना थारा नाही. तसेच माझा कोण्या व्यक्तीला नव्हे, तर प्रवृत्तीला विरोध आहे. तथापि, अनिल चौधरींच्या रविवारी होणार्‍या प्रवेश सोहळ्याची मला काहीही माहिती नाही. कार्यकर्त्यांना संयम राखायला सांगितले आहे. कोण्या एका व्यक्तीसाठी पक्ष सोडता येत नाही. मी तर पक्षवाढीसाठी प्रयत्न केले आहेत. नाथाभाऊ अशी 10 माणसे उभी करू शकतो. याबाबत कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय होऊ नये, असे माझे मत आहे. एकनाथ खडसे, विरोधी पक्षनेते


महानगरची बैठक रद्द
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात नियोजन करण्यासाठी भाजपा महानगरची बैठक रविवारी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आली होती; परंतु चौधरींच्या प्रवेशावरून खडसे नाराज असल्याचे कळताच सर्व पदाधिकारी त्यांच्या बंगल्याकडे रवाना झाले. तसेच राजीनामे देण्याचा निर्णय झाल्याने ही बैठक रद्द करण्यात आली.

गैरसमजुतीतून राजीनामे
नगरसेवक व पदाधिकार्‍यांनी गैरसमजुतीतून राजीनामे दिले. तसेच परिस्थिती आता निवळली असून, नाथाभाऊंनी कार्यकर्त्यांना कामाला लागायचे आदेश दिले आहेत. अनिल चौधरींच्या प्रवेशाबाबत मतभिन्नता आहे; पण मतभेद नाही. तथापि, लोकसभा निवडणुकीसंदर्भात महायुतीची बैठक 22 किंवा 23 मार्च रोजी घेण्याचा प्रय} असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिली.

खडसे यांच्या राजीनाम्याची अफवा
चौधरींच्या प्रवेशावरून सुरू असलेल्या राजकारणातून एकनाथ खडसे आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची अफवा पसरली. याबाबत माहिती कळताच महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक व शहरातील वेगवेगळ्या आघाड्यांचे पदाधिकारी त्यांच्या बंगल्यावर दाखल झाले. सर्वांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याकडे सामूहिकपणे राजीनामा देत खडसेंच्या भूमिकेला पाठिंबा दिला. या वेळी भुसावळच्या शहराध्यक्षांसह नगरसेवकांनीही फोन करून आमचेही राजीनामे पाठवत असल्याचे जिल्हाध्यक्षांना कळवले. यानिमित्ताने भाजपाचे जळगाव व भुसावळचे नगरसेवक आणि पदाधिकार्‍यांची मोठी गर्दी झाली होती.