आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शॉकने विद्यार्थ्याचा मृत्यू, दोन जखमी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल/जळगाव - लोखंडी अँगलचा वीजवाहक तारांना स्पर्श होऊन झालेल्या अपघातात 21 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना किनगाव (ता.यावल) येथे मंगळवारी घडली. या घटनेत इतर दोन विद्यार्थी विजेचा धक्का लागल्याने जखमी झाले. किनगाव येथील कृषी तंत्रनिकेतन केंद्र विद्यालयात मंगळवारी सकाळी 10.30च्या सुमारास ही घटना घडली.


..अशी घडली घटना
सोमवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे या शेतकी शाळेतील गांडूळ खतासाठी तयार केलेले ग्रीन नेटचे शेड पडले. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास त्या शेडचे लोखंडी पाइप शाळेचे कर्मचारी आणि काही विद्यार्थी इमारतीच्या छतावर ठेवत होते. या वेळी द्वितीय वर्षाचा विद्यार्थी मनोज प्रकाश नारेकर (वय 19, रा.यावल) याच्या हातातील पाइपाचा स्पर्श जवळून गेलेल्या उच्च दाबाच्या वीजवाहिनीला झाला. त्यामुळे जोरदार शॉक लागून मनोजचा मृत्यू झाला, तर प्रथम वर्षात शिकणारा गणेश अशोक पाटील (वय 21, वडगाव बु., ता.चोपडा) आणि द्वितीय वर्षाचा विद्यार्थी निखिल मनोज महाजन (वय 20, रा.मोहराळा, ता.यावल) हे दोघे गंभीर जखमी झाले.
दरम्यान, तिन्ही विद्यार्थ्यांना तत्काळ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बर्‍हाटे यांनी तिघांवर प्रथमोपचार केले. त्यानंतर तिघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मनोज नारेकर या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. इतर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे किनगावावर शोककळा पसरली. मृत विद्यार्थ्यावर बुधवारी सकाळी 11 वाजता यावल येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. यावल येथील वीज वितरण कंपनीचे सहायक अभियंता बी. एम. कुमावत, कनिष्ठ अभियंता एस. व्ही.चौधरी, डी. आय. पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली.


जबर मानसिक धक्का
दुर्घटनेतील मृत विद्यार्थ्याचे वडील प्रकाश नारेकर यांचे यावल तहसील कार्यालयासमोर सायकल दुरुस्तीचे दुकान आहे. या व्यवसायातून मिळणार्‍या अल्पश: उत्पन्नातूनही मुलांना उच्चशिक्षित करण्याची नारेकरांची जिद्द होती. त्यांच्या या जिद्दीला मनोजनेही यशस्वी साथ दिली होती. मनोज हा अतिशय शांत आणि हुशार विद्यार्थी होता. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांनाही जबर मानसिक धक्का बसला.


आर्थिक मदत करणार!
घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. सोमवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे शेड पडले होते. त्याचे पाइप शाळेतील शिपाई ठेवत असतानाही त्यांना मदत करण्यासाठी विद्यार्थी गेले असता, ही घटना घडली. विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाचाच हा भाग आहे; मात्र आम्ही विद्यार्थ्यांकडून काम करवून घेत नाहीत. तथापि, मृताच्या नातेवाइकांना आणि जखमींना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करेन. रमेश पाटील, संस्थाध्यक्ष


..अन् दुर्घटना घडली
वादळी पावसामुळे ग्रीन नेट शेड पडले होते. ते उचलण्यास आम्हाला सुरवाडे सरांनी सांगितले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पाइप उचलून ठेवत असताना ही दुर्घटना घडली. गणेश पाटील, जखमी विद्यार्थी