आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Enviornment Distriction

उंच इमारती रोखतील पर्यावरणाचा विनाश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - कोणत्याही शहराचा विकास करताना शहराबाहेरील शेतीला अकृषी (एनए) करण्याची परवानगी न देता उंच इमारती बांधण्याचा आग्रह धरावा. त्याचबरोबर शहराची हद्द निश्चित करूनच विकासाचा आराखडा तयार करावा. कारण शेती वाचवली तरच अर्थचक्र अबाधित राहून पर्यावरणाचा र्‍हास रोखता येईल. त्यामुळे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या योजनेतून शहर विकासाचा पर्याय स्वीकारावा, असे मत ऑस्ट्रेलियातील आरएमआयटी विद्यापीठाचे प्राध्यापक तथा युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट सिटी प्रोग्रामचे संचालक पॉल जेम्स यांनी व्यक्त केले.


एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयात मंगळवारी ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट’ या विषयावर राष्ट्रीय परिषद झाली. त्यानिमित्ताने शहरात आलेले प्रा.पॉल यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने संवाद साधून शहराचा शाश्वत विकास कसा करता येईल, याबाबत महत्त्वाच्या टिप्स घेतल्या. प्रा.पॉल यांनी अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये अशा उपाययोजना अमलात आणून शहरांचा विकास साधला आहे. तसेच त्यांनी या वेळी भारतीय शहरांमध्ये असलेल्या प्रमुख अडचणींवर प्रकाश टाकून त्यावर उपायही सुचवले. अरुंद रस्ते, पार्किंग, प्रदूषण, वाहतुकीची कोंडी या दैनंदिन अडचणींवर कशी मात करता येईल यावर प्रा.पॉल यांचा अभ्यास आहे.


वाहतूक व्यवस्थेसाठी ‘वन-वे’ आवश्यक
जळगावसारख्या छोट्या शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी वाढत आहे. त्यासाठी शहरात फ्लाय ओव्हर ब्रीज असावेत. तसेच शहरातील काही रस्त्यांचा वन-वे म्हणूनच वापर व्हावा. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही. कारण एकाच रस्त्यावरून दुतर्फा वाहतूक केल्यास अपघाताच्या शक्यताही वाढतात. याशिवाय पार्किंगच्या व्यवस्थेत सुधारणा करावी. पोलिस आणि नागरिकांची स्वयंशिस्त पार्किंगची समस्या सोडवू शकते. कोणत्याही जागेवर पार्किंग करताना ती एका सरळ रेषेत केल्यास जागा कमी लागतो. तसे पट्टे पोलिस प्रशासनाने आखून द्यावेत. त्यासाठी नागरिकांची शिस्तही महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे अतिक्रमण करणार्‍या हॉकर्ससाठी झोन आवश्यक आहे. झोन निश्चित केल्यानंतर ग्राहकांनाही हळूहळू त्याची सवय लागते.


बिल्डर्स, नागरिक अन् पालिका प्रशासनात समन्वय असावा
शहराबाहेरील शेती एनए करून त्या ठिकाणी शहराचा विस्तार करण्याऐवजी आहे त्याच जागेवर उंच इमारतींचे बांधकाम झाले पाहिजे. त्यामुळे शेती वाचेल. परिणामी, पर्यावरणाचे रक्षण होईल. पालिकेने एनएसाठी परवानगी देऊ नये व एकापेक्षा जास्त छोटे बिल्डर्स एकत्र आणून मोठय़ा भूखंडाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करावी. तसेच एकापेक्षा जास्त कॉलन्यांचे ड्रेनेज एकत्र आणून ते शहरातील मुख्य ड्रेनेजला जोडल्यास गटारी, नाले नियंत्रणात राहतील. हे करण्यासाठी बिल्डर्स, नागरिक आणि पालिका प्रशासनात समन्वयाची सक्ती पालिकेने करावी. याशिवाय याच परिसरांमध्ये नागरिकांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होतील असे छोटे मार्केटही असावे, जेणेकरून मुख्य बाजारपेठेत होणारी गर्दी व वाहतुकीचा त्रास टाळता येईल.