आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Farmer, Dam, Deepnagar Electricity Producation Centre

वेल्हाळे राखेच्या बंडावर बांधला बंधारा; शेतकर्‍यांना दिलासा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - वेल्हाळे अँश पॉँड (बंड)मधील वेअरमधील आऊटलेटमधून पाण्याबरोबर राखेचे लोटही बाहेर निघत होते. ‘दिव्य मराठी’ने या विषयाला वाचा फोडल्यानंतर दीपनगर वीजनिर्मिती प्रकल्प प्रशासनाने वेअरच्या आऊटलेटजवळ तत्काळ दगड, मुरुमाचा बंधारा उभारला आहे. आता वेल्हाळे नदीपात्रात जाणार्‍या राखेवर नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे.


दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून वेल्हाळे येथील क्रमांक तीनच्या अँश पाँडमध्ये राख टाकली जाते. दक्षिणेकडून उत्तरेकडे नैसर्गिक उतार असलेल्या या पॉँडमध्ये थेट उत्तरेलाच राख टाकली जात असल्याने पॉँडमध्ये असलेल्या एकाच वेअरजवळ राखेच्या पाण्याचा लोट साचत होते. वेअरमधून स्वच्छ पाण्याबरोबर राखेचे लोट कृत्रिम खोदकाम केलेल्या नदीतून वाहत असल्याने राख पुढे वेल्हाळे येथील ऐतिहासिक तलावात साचत होती. वेअरमधून पाण्याचे प्रमाण वाढल्याने वेल्हाळे तलावाचे बॅकवॉटरही वाढले होते. तलावातील राखमिर्शित पाणी थेट शेतीशिवारात शिरल्यामुळे किमान 100 एकर जमिनीवरील पीक नष्ट होण्याच्या मार्गावर होते. याबाबत शेतकर्‍यांनी तहसीलदार वैशाली हिंगे यांनाही निवेदन दिले होते. प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याने ‘दिव्य मराठी’ने या विषयावर वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी तसेच कृत्रिम खोदकाम करून प्रवाह वळवलेल्या नदीत राख जाऊन प्रदूषण होऊ नये म्हणून प्रशासनाने वेअरजवळ बंधारा उभारण्याचे नियोजन केले. वेल्हाळे येथील स्थानिक ठेकेदाराकडून दगड आणि मुरुमाचा वापर करून बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधार्‍याची मोडतोड होऊ नये, म्हणून दोन जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.


पाइपलाइन वाढवावी
अँश पॉँडची रचना अभियांत्रिकी शास्त्रानुसार योग्य आहे. मात्र, दीपनगर प्रशासनाने राखेची पाइपलाइन वाढवून राखमिर्शित पाणी पॉँडच्या मध्यभागी टाकले पाहिजे. तेथून राख साचून पाणी वेअरद्वारे बाहेर निघेल. राजेंद्र चौधरी, सदस्य, जिल्हा परिषद


प्रत्येकाचे सहकार्य हवे
बंधारा उभारून देखभालीसाठी स्थानिक व्यक्तींची नियुक्ती केली. सध्या राखेचे लोट नदीतून जाण्याचे प्रमाण बंद झाले आहे. एल. बी. चौधरी, उपमुख्य अभियंता, वीजनिर्मिती केंद्र, दीपनगर


ट्रॅक्टर चालकांकडून नासधूस
वेल्हाळे अँश पॉँडमधून राख उचलण्यासाठी दररोज किमान 100 ट्रॅक्टर या भागात राखेची वाहतूक करतात. पाँडमध्ये आतील भागात न जाता एकाच ठिकाणावर पाइपलाइन फोडून राख उचलली जाते. वेअरजवळूनही ट्रॅक्टरची वाहतूक होत असल्याने चार्‍या तयार होऊन त्यातून राखेचे उत्सर्जन होते.


वनस्पती वाढली
वेल्हाळे तलावात सातत्याने दीपनगरातील राख मिसळली जात असल्याने पाणवनस्पती वाढल्या आहेत. या वनस्पतींचे मुळासकट निर्मूलन करणे आता कठीण होणार आहे. या मुळे अनेक वर्षांपासून सुरू असलेला मत्स्यपालन व्यवसाय धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. दीपनगर प्रशासनाने तलावातील राख आणि पाणवनस्पती काढण्यासाठी व्यापक यंत्रणा आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उपाययोजना करणे आवश्यक आहे.