आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Food Donation, Divya Marathi

गरजूंची भूक भागवणारी जनकल्याण समितीची ‘अन्नपूर्णा योजना’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - पुण्य मिळवण्यासाठी अन्नदानाचा मार्ग सोयीस्कर मानला जातो; मात्र त्यासाठी दिलेले अन्न हे गरजूंपर्यंत पोहोचणेही तितकेच आवश्यक असते. शहरातील जनकल्याण समितीने गरजूंना मोफत अन्न मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही योजना सफल होण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्ती तसेच पूर्वजांच्या नावाने, एखाद्या निमित्ताने किंवा सामाजिक जबाबदारीच्या जाणिवेतून अन्नदान करू इच्छिणार्‍यांना या समितीने हा नवा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. परिणामी अन्नदान करू इच्छिणार्‍यांकडून समितीकडे पुढील 365 दिवसांची आगाऊ नोंदणी करण्यात आली आहे.


25 कार्यकर्ते देताहेत सेवा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने कार्यरत असलेली ही जनकल्याण समिती गेल्या 12 वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातील विविध सेवांशी संबंधित आहे. रुग्णालयात येणार्‍या बहुतांश रुग्णांसह नातलगांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने उपचारादरम्यान त्यांच्या भोजनाची हेळसांड होते. या अनुभवातूनच समितीने जिल्हा रुग्णालयात अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे. त्यासाठी राबणारे 25 कार्यकर्ते हे नि:स्वार्थ भावनेने काम करीत आहेत. बसस्थानकाजवळील क्षुधाशांती केंद्रात हे सात्विक जेवण तयार केले जाते. येथील खर्चाचे वर्षाच्या अखेरीस लेखापरीक्षणही केले जाते. देणगीदारांना समितीकडून रकमेची पावतीही दिली जाते.


25 कार्यकर्ते देताहेत सेवा
10 रुपये प्रतिडबा जेवणाचे डबे देऊ इच्छिणार्‍यांसाठी
12 वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातील विविध सेवांशी संबंधित


असे आहे समितीचे कार्य
दररोज जिल्हा रुग्णालयात 25 डब्यांचे वितरण केले जाते. दोन महिन्यांपासून उपक्रम सुरू आहे. 10 रुपये प्रतिडबा याप्रमाणे 25 ते 35 डब्यांपर्यंतचा खर्च इच्छुकांकडून दिला जात आहे. गरजूंसाठी एकही सुटी न घेता हा उपक्रम अखंडपणे सुरू आहे.


असे होते डब्यांचे वाटप
गरजूंना डब्यांचे वाटप व्हावे, यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांकडून आदल्या दिवशी अशा गरजूंचा शोध घेतला जातो. जिल्हा रुग्णालयात असलेल्यांपैकी गरजू रुग्ण व नातेवाइकांना समितीकडून कुपन दिले जाते. दुसर्‍या दिवशी 11 वाजेनंतर रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या चहाच्या स्टॉलवर हे कुपन देऊन अन्नाचे पॅकेट गरजूंना मिळते. कुपन न आणल्यास जेवणाचे पॅकेट हे इतर गरजूंना दिले जाते. वितरणाची तारीख व वेळ यासंबंधीची माहिती दानशूरांना आधी दिली जाते.

अन्नपूर्णा योजनेत अन्नदान करण्यासाठी जनकल्याण समिती सदस्य राजू ज्ञाने, विनोद कोळी, निंबा सैंदाणे, सुनील याज्ञिक यांच्याशी अथवा सेंट्रल फुले मार्केट समोरील व्ही.घाणेकर ब्रदर्सचे दीपक घाणेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन या समितीने केले आहे.


गरजूंपर्यंत अन्न पोहोचावे यासाठी हा उपक्रम आहे. डब्यांची संख्या वाढवण्यासोबतच जिल्हा रुग्णालयासारखी अन्य काही ठिकाणे शोधून तेथे अन्न पोहोचवण्याचे नियोजन केले जात आहे. जेवणात सणाच्या दिवशी गोड पदार्थ देण्याचाही समितीचा प्रयत्न आहे. - दीपक घाणेकर, जनकल्याण समिती सदस्य.