आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळपीक विम्यासाठी आता दिल्लीत उपोषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - हवामानावर आधारित फळपीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी शिवराज्य पक्ष आणि शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ दिल्लीकडे रवाना झाले आहे. बुधवारी (दि.26) केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना निवेदन देण्यात येईल. न्याय न मिळाल्यास दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर उपोषण करू, असा इशारा पदाधिकार्‍यांनी दिला.


चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात हवामानावर आधारित फळपीक विम्याचा लाभ केवळ हवामान मोजणी यंत्रणा सदोष असल्याने मिळाला नाही. यानंतर शेतकर्‍यांनी मागणी केल्याने तीन वेळा विविध समित्यांनी पाहणी केली, तरीही केंद्र शासनाचा कृषी विभाग आणि अँग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडून मदत मिळालेली नाही. शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवराज्य पक्षातर्फे जिल्हा सचिव डी. एम. पाटील यांनी यावल येथे उपोषण केले. मात्र, शासनाने दखल न घेतल्याने आता दिल्ली येथील जंतरमंतर मैदानावर उपोषण करण्याचा निर्णय शिवराज्यने घेतला आहे. तत्पूर्वी, बुधवारी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना भेटून निवेदन देण्यात येईल.
यासाठी शिवराज्यचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, जिल्हा सचिव डी. एम. पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा संघटक शैलेश ठाकरे, शेतकरी जगदीश पाटील, दीपक पाटील (आडगाव) हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. शिष्टमंडळ पवारांकडे आचारसंहितेपूर्वी केळी उत्पादकांना विम्याची हेक्टरी 1 लाखाची रक्कम देण्याची मागणी करणार आहे. असे कळवण्यात आले आहे.


शासन उदासीन
शेतकर्‍यांच्या ज्वलंत प्रश्‍नांबाबत शासनाचे धोरण उदासीन आहे. केळी विम्याच्या लाभासाठी दिल्लीत उपोषण करण्याची वेळ आली आहे. सोमवारी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची प्रतिहेक्टरी 1 लाख रुपये सरसकट भरपाई द्यावी, अशी विनंती कृषिमंत्र्यांना करू. ज्ञानेश्वर आमले, जिल्हाध्यक्ष, शिवराज्य पक्ष