आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, House Breaking, Local Crime Police Branch

भरदिवसा घरफोडी करणारी टोळी जेरबंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - भरदिवसा घरफोडी करणार्‍या टोळीतील दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी अटक केली. या दोघांनी भुसावळ तसेच मुक्ताईनगर तालुक्यात महिनाभरात 8 घरफोड्या केल्याची कबुली दिली. या चोरट्यांनी इतर जिल्ह्यांमध्ये 14 घरफोड्या केल्या आहेत.


घरफोडीचा तपास करणार्‍या एलसीबीच्या पथकाने दौलताबाद (जि.औरंगाबाद) येथून शेख लियाकत शेख बाबुलाल (वय 24) आणि चिखली तालुक्यातील मेरा बुद्रूक येथून किशोर तेजराव वायाळ (वय 32) यांना एलसीबीच्या पथकाने मुक्ताईनगर येथून अटक केली आहे. अटक केलेले दोघे सुरत येथे रिक्षाचालक होते. त्यानंतर दोघांनी तो व्यवसाय सोडून ते आपापल्या गावी परतले होते. दरम्यान, गेल्या वर्षी किशोर वायाळ याच्या नातेवाइकाला औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर योगायोगाने औरंगाबादेत या दोघांची भेट झाली. याच ठिकाणी त्यांनी घरफोड्या करण्याचा कट रचला. दोघेही किशोर वायाळ याच्या गावी गेले तेथून त्यांचा घरफोडीचा प्रवास सुरू झाला. पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते, उप निरीक्षक अजय खर्डे, मनोहर देशमुख, महेंद्र पाटील, बापू पाटील, योगेश पाटील, मनोज दुसाने, अय्युब खान, सुशील पाटील यांच्या पथकाने यांना ताब्यात घेतले आहे.


इतर जिल्ह्यात 14 घरफोड्या : मुक्ताईनगर शहर आणि तालुक्यात 3, भुसावळ शहरात, पहूर, आणि पहूर पाळधी येथे प्रत्येकी 1 तर जळगाव जिल्ह्यात 6 घरफोड्या केल्याची कबुली दोघांनी एलसीबीला दिली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील दुई येथील दीपक फेगडे यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोने, चांदी आणि रोख रक्कम असा एकूण 2 लाख 40 हजार रुपयांची घरफोडी केल्याच्या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय जालना, अंबड, अकोला, खामगाव, चिखली, बुलडाणा या ठिकाणी त्यांनी 14 घरफोड्या केल्या आहेत. या प्रकरणात त्यांना अटकही झाली होती. त्यावेळी त्यांच्याकडून चोरी केलेल्या मालापैकी 15 लाख रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.


अफलातून शक्कल
दोघांनी दिवसा घरफोड्या करताना अफलातून शक्कल लढवल्या आहेत. स्वत: गुटखा, किराणा मालाचे व्यापारी असल्याचे भासवून ते परिसर तपासून घेत. घराबाहेर नागरिकांनी लिहिलेल्या बाहेरगावी जाण्याच्या पाट्यांवरून ते बंद घरे निश्चित करीत असत. एकदा एका घराचे कुलूप तोडत असताना शेजारच्याने हटकल्यानंतर खोटाच फोन लावून घरमालकाशी बोलत असल्याचे त्यांनी भासवले होते. आम्ही प्लंबिंगचे काम करणारे असून, घरमालकानेच कुलूप तोडायला सांगितल्याचे सांगत घरफोडी केली.