आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपूर्ण पोलिस कर्मचार्‍यांमुळे कायदा-सुव्यवस्था धोक्यात,सार्वजनिक सुरक्षा वा-यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शहरातील सहा पोलिस ठाण्यांमध्ये मंजूर कर्मचारी संख्या आणि प्रत्यक्ष नियुक्त असलेल्या संख्येत तफावत आहे. पोलिस कुमक कमी पडत असल्यामुळे शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. गेल्या दीड महिन्यात शहरात मोठे गुन्हे, दंगली सारख्या घटना घडल्या. या घटनांवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तसेच कर्मचार्‍यांच्या तुटवड्यामुळे विविध गुन्ह्यांचे तपास काम देखील रखडले असून याचा उपलब्ध कर्मचार्‍यांच्या मानसिकतेवरही विपरीत परिणाम होत आहेत.


5.50 लाख लोकसंख्या असलेल्या जळगाव शहरात एकूण सहा पोलिस ठाणी आहेत. यातील तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत 43 गावांचा समावेश आहे. या गावांत सुमारे 80 हजार लोकसंख्या आहे. यांच्या सुरक्षेसाठी तालुका पोलिस ठाण्यात केवळ 55 पोलिस कर्मचारी मंजूर आहेत. त्यापैकी 49 कर्मचारी नियुक्त केले आहेत. सामान्य नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करून देण्याचे काम पोलिस दलातर्फे करण्यात येते. मात्र, वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पोलिस बळ कमी पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.


उपलब्ध असलेल्या कर्मचार्‍यांना मंत्र्यांचे दौरे, आंदोलने, सन-उत्सवांच्या बंदोबस्तासाठी वापरले जाते. ऐनवेळी कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्यानंतर अत्यंत कमी कर्मचार्‍यांकडून जास्त कामाची अपेक्षा केली जाते. त्यामुळे पोलिस ठाण्यांमधील अंतर्गत समन्वय आणि शांततेचाही भंग होत आहे.


कर्मचार्‍यांची संख्या कमीच
जिल्ह्यातील पोलिस दलात आरसीपी आणि क्यूआरटी फोर्स तयार केले आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रo्न निर्माण झाल्यास या फोर्सची मदत होते. मंजूर कर्मचारी संख्येतूनच काही कर्मचारी वेगळे काढून फोर्स तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यात संख्याबळ कमी दिसते. या शिवाय काही प्रमाणात कर्मचार्‍यांची संख्या कमी आहेच. एस.जयकुमार, पोलिस अधीक्षक

एक्सक्लुझिव्ह टीम नाही
प्रत्येक पोलिस ठाण्यात काही पोलिसांची एक एक्सक्लुझिव्ह टीम तयार करणे आवश्यक आहे. या टीममधील कर्मचारी केवळ गुन्ह्यांचा तपास करतात. त्यांना इतर बंदोबस्ताची कामे दिली जात नाहीत; मात्र शहरात अशा प्रकारच्या टीम अस्तित्वात नाहीत. परिणामी तपासाचे काम थंडावल्याचे चित्र आहे.

कोर्टाच्या कामाला प्राधान्य
पोलिस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या खटल्याकामी न्यायालयातून समन्स येतात. हे समन्स संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याच्या कामाला अधिक प्राधान्य द्यावे लागते. अनेक वेळा परराज्यातील आरोपींच्या समन्ससाठी पोलिस ठाण्यातून कर्मचारी पाठवला जातो. हा कर्मचारी किमान आठवडाभरासाठी उपलब्ध होत नाही. त्यामुळे शिल्लक कर्मचार्‍यांच्या कामाच्या वेळेत वाढ होते.

काय फरक पडतोय ?
केस 1 : 15 जानेवारी 2014 : तांबापुरात जातीय दंगल उसळली. यावेळी गस्तीवर असलेले एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक डी.डी.इंगोले आणि दोन कर्मचारी तांबापुरात घटनास्थळी पोहोचले. बोटावर मोजण्याइतक्या पोलिसांनी सुमारे 45 मिनिटे दंगलीवर नियंत्रण मिळवण्याचा केविलवाणा प्रय} केला. त्यानंतर त्यांना शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातून कुमक उपलब्ध झाली.

केस 2 : 17 फेब्रुवारी 2014 : गणेश कॉलनी रोडवरील युनियन बँकेच्या एटीएममध्ये चोरीचा प्रय} झाला. शहरातील वर्दळीच्या भागात भररस्त्यावर असलेले एटीएम फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. रात्रीच्या गस्तीवर असलेले पोलिस पथक मुख्य रस्त्यावरून फिरले होते किंवा नाही? हा प्रo्न या घटनेमुळे निर्माण झाला. मुख्य रस्त्यावर एवढय़ा मोठी चोरी करण्याचे धाडस चोरट्यांनी दाखवले. त्यामुळे पोलिसांचा वचक न राहिल्याचे चित्र समोर आले.

सर्वच पोलिस ठाण्यात संख्याबळ कमी

मानसिकतेवर परिणाम
कमी मनुष्यबळ असल्यामुळे शिल्लक कर्मचार्‍यांना अधिक काम करावे लागते. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावर ताण पडतो. अशा त्रासलेल्या अवस्थेत काही कर्मचार्‍यांचे नागरिकांशी विसंवाद होतात. त्यामुळे कर्मचार्‍यांची प्रतिमा मलिन होते.


पोलिस कर्मचारी गुंतले मंत्री, सण-उत्सवांच्या बंदोबस्तात; सार्वजनिक सुरक्षेवर परिणाम
0 जास्त वेळ कामामुळे कर्मचार्‍यांच्या मानसिकतेवर परिणाम.
0 अतिरिक्त बंदोबस्तांमुळे गुन्ह्यांचा तपास थंडावतो
0 सामान्यांना अपेक्षा असल्याप्रमाणे पोलिसांकडून काम होत नसल्याचा संदेश पसरतो
0 सार्वजनिक स्थळांवर छेडछाड, भुरट्या चोर्‍यांच्या प्रमाणात वाढ
0 रात्रीच्या गस्तीसाठी मनुष्यवळ कमी पडते; परिणामी सुरक्षेवर विपरीत परिणाम होतो.
0 अट्टल गुन्हेगार, फरार आरोपींच्या शोधासाठी विषेश कामगिरी होत नाही