जळगाव - जळगावसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये कार्यभारानुसार प्राध्यापकांची 400 पदे रिक्त आहेत. ही पदे भरली जावी यासाठी पाठपुरावा करण्यास उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कमी पडत आहे, असा ठपका प्राचार्य अनिल राव यांनी अधिसभेच्या बैठकीत ठेवला.
विद्यापीठांतर्गत असणार्या महाविद्यालयांतील रिक्त पदांचा आढावा घेण्याचे काम शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून घेण्यात येते; परंतु गेल्या तीन, चार वर्षांपासून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्यांच्या रिक्त पदाचा आढावा घेतला गेला नाही. यामुळे खान्देशातील महाविद्यालयातील शिक्षकांची 400 पदे रिक्त राहिली आहे. शासनाकडून वेगवेगळी कारणे पुढे करून या पदांच्या मान्यतेकडे लक्ष दिले जात नाही. विद्यापीठही पाठपुरावा करण्यात अपयशी ठरले.1998 मध्ये महाविद्यालयांमधील विद्यार्थी संख्येनुसार पदांचा आढावा घेतला होता. त्यानंतर अनेक बदल झाले आहेत. गेल्या अडीच वर्षांपासून कार्यभारानुसार प्राध्यापकांची पदे निश्चित करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. पण शासनाकडून पदांची निश्चिती केली जात नाही आणि नवीन पदांनाही मंजुरी मिळत नाही. तसेच तात्पुरत्या स्वरूपात नेमलेल्या शिक्षकांना मान्यता देण्यास विद्यापीठ तयार होत नाही, असे प्राचार्य अनिल राव यांनी सांगितले.