आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Loadsheding, Electricity

अर्ध्‍या जळगाव शहरात 20 तासांनंतर आली वीज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बेमोसमी पावसामुळे सोमवारी रात्री 10 वाजेपासून अर्ध्‍या शहरात खंडित झालेला वीजपुरवठा तब्बल 20 तासांनंतर सुरळीत झाला. वीज बंद असल्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. वादळी वार्‍यामुळे अनेक ठिकाणी झाडे, होर्डिंग्ज पडून कंडक्टर तसेच पोल तुटल्यामुळे वीज खंडित झाल्याचे क्रॉम्प्टन कंपनीच्या अधिकार्‍यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.


सोमवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास बेमोसमी पावसाला सुरुवात झाली. वादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. रिंगरोड परिसरात वृक्षच तारांवर पडल्याने तारा तुटल्या होत्या. यासह अजिंठा चौफुली, जिल्हापेठ भागात होर्डिंग्ज तारांवर पडल्यामुळे कंडक्टर तुटले होते. परीक्षांचे दिवस असल्याने रात्री उशिरापर्यंत अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. तसेच वीज नसल्यामुळे अनेक भागातील पाण्याचे नियोजन विस्कळीत झाले होते.


रात्री क्रॉम्प्टनचे कॉल सेंटर होते बंदच
पाऊस बंद होऊनही वीजपुरवठा सुरू होत नसल्याने नागरिकांनी खंडित वीजपुरवठय़ाच्या तक्रारी क्रॉम्प्टनच्या कॉल सेंटरवर केल्या. मात्र, तेथे कोणीही फोन उचलत नसल्याने नागरिक संतापले होते.


या भागात पुरवठा बंद
नवीपेठ, गणेश कॉलनी, अयोध्यानगर, रामेश्वर कॉलनी, स्नहेल कॉलनी, सानेगुरुजी कॉलनी, जिल्हाधिकारी बंगल्याकडील काही भाग, रिंगरोड, खेडी रोड, जिल्हापेठ, चौबे मार्केट, कांचननगर, वाघनगर, हरिविठ्ठलनगर, महाबळ परिसर या भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. रामदास कॉलनी, ओंकारेश्वरनगर मंदिर परिसर भगवाननगर, भूषण कॉलनी या भागात सायंकाळी सातपर्यंत वीज नव्हती.

वीजपुरवठा पूर्ववत
वादळी वार्‍यामुळे होर्डिंग्ज तारा व वीज खांब खाली पडून अर्ध्‍या शहरात वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री 11 वाजेपर्यंत पावसाचे वातावरण होते. त्यानंतर टीम दुरुस्तीच्या शोधात निघाले. काही भाग रात्रीच सुरू झाला. तारा कंडक्टर तुटल्याने ते दुरुस्त करून दुपारी दोन वाजेपर्यंत सर्वच भागात वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. चेतन मेहता, शहर अभियंता क्रॉम्प्टन