आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Lok Sabha Election, Nationalist Congress, Divya Marathi

लावलेलं झाड चंदनाचं नव्हे, बाभळाचं निघालं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - भुसावळच्या ‘साई डेअरी’नजीक जामनेर रोडवर माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी पक्षप्रवेशापूर्वीच भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी गेल्या आठवड्यात कार्यालय सुरू केले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी ‘आम्ही लावलेलं झाड चंदनाचं असेल असं वाटलं होतं; पण ते तर बाभळाचं निघालं’ असं खोचक विधान केलं आहे. त्यांनी हे विधान करताना कोणाचा नामोल्लेख केला नसला तरी त्यांचा रोष हा राष्‍ट्रवादीचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्यावरच होता, हे नाकारता येणार नाही.


भुसावळ विधानसभा मतदार संघ राखीव झाल्याने राष्‍ट्रवादीतर्फे संजय सावकारेंना आपण निवडून आणले. मात्र, संकटसमयी त्यांच्याकडून गेल्या दोन वर्षात समाधानकारक मदत झाली नाही, याचे शल्य बोचत असावे म्हणून चौधरींनी हे विधान केलेले दिसते. कदाचित, एखाद्या राखीव जागेवर आपल्या कार्यकर्त्याला निवडून आणले म्हणजे त्याने फक्त हुजरेगिरी करण्यातच धन्यता मानली पाहिजे, अशी त्यांची विचारधारणा असल्याचेही यातून अधोरेखित होते. एवढेच नव्हे तर त्यांचे हे भाषण म्हणजे भविष्यात ‘टार्गेट सावकारे’ हाच एककलमी कार्यक्रम राहू शकतो. स्थानिक शिवसेनेचे ‘पितामह’ म्हणून ओळखले जाणारे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा, पहिले शहरप्रमुख सुभाष बागुल यांनी अनिल चौधरींनी सुरू केलेल्या कार्यालयात लावलेली हजेरीही बहुचर्चित ठरली आहे. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष गिरीश महाजन यांनीही विधान परिषदेत खासदार जैन यांनी किती खोके (सांकेतिक भाषेत एक खोका म्हणजे 1 कोटी) खर्च केले, याचे आकडे सांगितले तर अनेकांचे डोळे पांढरे होतील, असे जळजळीत वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी या वेळी खोक्यांचे आकडे सांगण्याचा प्रयत्न केला खरा; पण निवडणूक आयोगाचे घोंगडे अंगावर येऊ नये म्हणून जीभेला आवर घातला होता. सहा महिन्यांपासून जाळे फेकण्याचे प्रयत्न सुरू होते, तेव्हा कुठे मोठा मासा (अनिल चौधरी) गळाला लागला, असे मिश्किल विधान करून त्यांनी हास्याचे फवारे उडवले होते. राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनीही गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ‘गद्दारी आमच्या रक्तात नाही’, असं परखड मत व्यक्त करून ‘स्पष्ट वक्ता सुखी भव’ या उक्तीचा प्रत्यय दिला आहे. पहिल्यांदाच त्यांच्या आक्रमक स्वभावाचे दर्शन कार्यकर्त्यांना झाले, हे विशेष!


आठवडाभरात कोण काय म्हणाले?
* जैन पिता-पुत्र खोक्यांना तर जणू रद्दी समजतात
गिरीश महाजन : राष्‍ट्रवादीचे खासदार ईश्वरलाल जैन व त्यांचे पुत्र मनीष हे दोघे जण खोक्याला (सांकेतिक भाषेत 1 कोटी) तर रद्दीच समजतात. 100 ते 200 खोके खर्च केले म्हणजे निवडणूक जिंकता येते, असा त्यांचा गैरसमज आहे. राष्ट्रवादीने चौधरी बंधुंच्या पाठीत खंजीर खुपसण्याचेच काम केले आहे. सहा महिने जाळे फेकल्यावर अनिल चौधरी गळाला लागले आहेत.
(प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र)
* चौधरींमुळे ऑक्सिजन, पॉवर अन् हत्तीचे बळ
जगन सोनवणे : संतोष चौधरी पायाला भिंगरी लावून प्रचारात सक्रिय झाल्याने आघाडीच्या कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. एवढेच नव्हे तर चौधरींमुळे ऑक्सिजन मिळाल्याने आमच्यात ‘पॉवर’ येऊन हत्तीचे बळ मिळाले आहे. त्यांची सक्रियता व अल्पसंख्याकांची बांधलेली मोट या दोन्ही गोष्टींमुळे रावेर लोकसभा मतदार संघात चमत्कार घडणार.
(जिल्हाध्यक्ष, पीआरपी, जळगाव)
* आम्ही तर राष्ट्रवादीच्या पालखीचे भोई आहोत
उमेश नेमाडे : निवडणूक लोकसभेची असो की, विधानसभेची, राष्ट्रवादीने जो उमेदवार दिला असेल त्याला निवडून आणण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून कामाला लागणे हेच आमचे ध्येय असते. आम्ही तर स्वत:ला राष्ट्रवादीच्या पालखीचे भोई समजतो. खांद्यावर घेतलेली पालखी निर्विघ्नपणे पुढे मार्गक्रमण करावी, असाच प्रयत्न असतो. गद्दारी आमच्या रक्तात नाही.
(नगराध्यक्ष, भुसावळ नगरपालिका)


* आखाडा रंगात आल्यावर राजकीय पत्ते केले उघड
अनिल चौधरी : आम्हाला वाटायचं की, आपण लावलेलं झाड चंदनाचं असेल; मात्र, ते बाभळाचं निघालं. विधान परिषदेच्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठीच मनीष जैन यांना आखाड्यात उडी घेऊ दिली. त्यानंतरच माझे पत्ते उघड केले. कार्यकर्त्यांची केलेली जोपासना हीच आमची श्रीमंती आहे. भुसावळात कोणाची किती ताकद आहे, हे निवडणुकीनंतर दिसून येईल.
(माजी प्रभारी नगराध्यक्ष, भुसावळ नगरपालिका)