आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Mahavitran, Divya Marathi, Lok Sabha Election

राजकारण्यांना गावबंदी अन् मतदानावरही बहिष्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर - पदाधिकार्‍यांचे उंबरठे झिजवले, अधिकार्‍यांना निवेदने दिली, संताप अनावर झाला म्हणून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाची तोडफोडही केली. एवढे करूनही उपयोग होत नसल्याने अखेर लोकसभा निवडणूक पाहता तळेगावकरांनी राजकारण बाजूला ठेवून राजकारण्यांना गावबंदी आणून मतदानावर बहिष्काराचा एकमुखी निर्णय घेतला आहे. तळेगावकरांच्या या निर्णयामुळे मात्र अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणाचा पदाधिकार्‍यांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


तळेगाव वीज उपकेंद्रावर 52 गावे आहेत. तळेगाव, शेळगाव, राहेरा, वाकडी, लोणी, कासली या गावांच्या सिंगलफेज योजना बंद आहेत. त्यामुळे महिनाभरापासून या गावांचे वीजभारनियमन आठ तासांवरून 14 तास करण्यात आले आहे. पैकी एकाच नाल्याच्या काठी वसलेल्या तळेगाव व शेळगाव या दोन गावांतील ग्रामस्थांनी 26 जानेवारी रोजी वीज वितरण कंपनीच्या तळेगाव कार्यालयात तोडफोड केली होती.


ग्रामस्थांनी केली होती तोडफोड
याबाबत कळताच आमदार गिरीश महाजन यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आंदोलनकर्त्यांना शांत करीत महिनाभरात सिंगलफेज योजना सुरू करून भारनियमन कमी करण्याच्या सूचना वीज वितरण कंपनीच्या कर्मचार्‍यांना केल्या होत्या. त्यानंतर दोन महिने उलटूनही वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी सिंगलफेज योजना कार्यान्वित केली नाही. पदाधिकार्‍यांच्याही शब्दाला वीज वितरण कंपनी किंमत देत नसल्याचे पाहून तळेगाव, शेळगावच्या ग्रामस्थांनी निवडणुकीचा मुहूर्त साधण्याचा निर्णय घेतला.


गावबंदीचा फलक
सर्वप्रथम राजकीय पुढारी, पदाधिकार्‍यांना गावबंदीचा निर्णय जाहीर केला. त्याचा प्रत्यय भाजपा उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार ताफा अडवून तळेगावकरांनी दिला. एवढय़ावरच न थांबता ताफ्यातील भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद अग्रवाल यांच्या वाहनाच्या काचाही फोडल्या. आता तर ‘पुढार्‍यांना गावबंदी’चा फलक बसस्थानकावरच लावला असून तळेगाव ग्रामस्थांनी मतदानावरही बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय जाहीर केला आहे.