आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाट-वढोद्यातील वाघांत साम्य नाहीच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ - वढोदा (ता.मुक्ताईनगर) वनक्षेत्रात दिसणारे पट्टेदार वाघ शेजारील मेळघाट अभयारण्यातून येत असावे, असा स्थानिकांचा अंदाज होता. मात्र, तो व्याघ्र अभ्यासकांनी खोटा ठरवलेला आहे. एकमेकांची छायाचित्रे आणि अन्य ठोकताळ्यांवरून मेळघाट आणि वढोद्यातील वाघांमध्ये कोणतेही साम्य नसून दोघांचे अस्तित्व पूर्णपणे वेगवेगळे असल्याचे या माध्यमातून पुढे आले आहे.


मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील परतवाडा येथील संशोधन अधिकारी विशाल पाटील यांनी वढोदा (ता. मुक्ताईनगर) वनक्षेत्रात सन 2012, 2013 आणि 2014 मध्ये आढळलेल्या वाघांच्या छायाचित्रांची मेळघाटातील 46 वाघांच्या छायाचित्रांसोबत तुलना केली. मात्र, यापैकी एकही छायाचित्र एकमेकांशी मिळते-जुळते नाही. या मुळे दोन्ही ठिकाणाचे वाघ वेगवेगळे असल्याचे ठोसपणे म्हणता येते.


छायाचित्रांचा अभ्यास
संशोधन अधिकारी विशाल पाटील यांनी, 22 मार्च 2012, 26 सप्टेंबर 2013 आणि 2 जानेवारी 2014 रोजी वढोदा वनक्षेत्रातील अनुक्रमे डोलारखेडा दक्षिण आणि चारठाणा बीटमध्ये दिसलेल्या वाघांच्या छायाचित्रांचा बारकाईने अभ्यास केला.


46 छायाचित्रांशी तुलना
मेळघाटात 50 च्या आसपास वाघ असले तरी 46 वाघांची स्वतंत्र ओळख आहे. या सर्वांच्या छायाचित्रांसोबत वढोद्यातील तिन्ही वाघांचे छायाचित्र जुळवून पाहण्यात आले. शरिरावरील पट्टय़ांच्या ठेवणीचा अभ्यास करण्यात आला. या मध्ये एकाही छायाचित्रात साम्य दिसून आले नाही.


मूळ शोधणे अवघडच
वढोद्यातील वाघांचे मूळ कुठे? हे शोधणे अवघड आहे. मात्र, भौगोलिक स्थितीचा विचार करता, मेळघाटातीलच एखादी जोडी स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी वढोद्याकडे स्थलांतरित झाली असावी, असा तज्ज्ञांचा कयास आहे.


अन्नासाठी पूरकता हवी
वढोद्यात वाघांचे अस्तित्व आनंददायी आहे. मात्र, त्यांच्याकडून गाय किंवा अन्य पाळीव प्राण्यांवर होणारे हल्ले पाहता तेथे तृणभक्षी प्राणी, हरणांची संख्या वाढणे गरजेचे आहे. शिकारीसाठी पोषक वातावरण असल्यास त्याचा इतरांना कोणताही त्रास होणार नाही. विशाल पाटील, व्याघ्र संशोधन अधिकारी, परतवाडा