आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Nonseason Rain,Hailstorm

जळगाव जिल्ह्यात गारपिटाई सुरूच, वादळाने एकाचा बळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बेमोसमी वादळी पाऊस आणि गारपिटीने आज तिसर्‍या दिवशीही जिल्ह्यात जामनेर, पारोळा, पाचोरा आणि जळगाव या तालुक्यांतील काही भागात 15 ते 20 मिनिटे थैमान घातले. यामुळे अनेक ठिकाणी पिके आडवी पडली. वादळात सापडल्यामुळे नगाव (ता.पारोळा) येथे एका शेतकर्‍याचा शेतातच मृत्यू झाला. बुधवारी झालेल्या वादळी पावसाचा खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे.


मंगळवार आणि आज बुधवारीदेखील दुपारी जिल्ह्याच्या बहुतांश भागात वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. बुधवारी शेतात काम करीत असलेले शेतकरी गोरख पंढरीनाथ पाटील (वय49,रा.नगाव, ता. पारोळा) हे वादळ व गारपिटीत सापडले. त्यांच्या शेतातील गुरांच्या गोठय़ाच्या छतावरील लोखंडी पन्हाळी पत्रे उडाली. त्यापैकी एक उडता पत्रा त्यांच्या मांडीला लागला. पत्रामुळे पायाची मांडी चिरून अतिरक्तस्त्रावाने त्यांचा शेतातच मृत्यू झाला. जळगाव तालुक्यातील वावडदा, म्हसावद, बोरनार तर पाचोरा तालुक्यातील पाथरी, लासगाव , सामनेर येथे चक्रीवादळाचा तडाखा बसला. यामुळे पाचोरा-जळगाव राज्य मार्गावरील असंख्य झाडे उन्मळून पडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पाऊणतास ठप्प होती. वादळ व गारपिटीची धास्ती शेतकरी व शेतमजुरांनी घेतली आहे. दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीवर आमदार चिमणराव पाटील यांनी विधानसभेत दाखल केलेल्या स्थगन प्रस्तावावर तातडीने मंगळवारी चर्चा झाली, मात्र ठोस आश्वासन शासनाकडून मिळाले नाही.


वार्‍याची दिशा 360 अंशात फिरल्याने जास्त नुकसान
जळगाव । जिल्ह्यात झालेल्या वादळासह गारपिटीत वार्‍याचा वेग आणि दिशा बदलल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. दुपारी 3 वाजेपर्यंत ताशी 7 किमी असलेल्या वार्‍याचा वेग 60 किमीवर गेला तर अवघ्या तासाभरात वार्‍याची दिशा 360 अंशात बदलली. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर झाडे उन्मळून पडली.


लक्षद्वीप बेट ते दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीपर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा मध्य भारतात गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम घाटापर्यंत पसरला. जळगाव जिल्ह्यात दुपारी 3 ते 4 वाजेदरम्यान वेगवेगळ्या पट्टय़ात वादळ घोंगावत होते. तापी, गिरणेच्या पात्रापासून ते अजिंठय़ाच्या पायथ्यापर्यंत वादळासह गारपीट झाली. दुपारी 3 वाजता चोपडा तालुक्यात निर्माण झालेले वादळ पारोळा, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, सोयगाव, जामनेर, बोदवड तालुक्यांत जाऊन पोहोचले.


कारण काय?
0 पूर्व राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश व छत्तीसगड परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत.
0 दक्षिणेला लक्षद्वीप, मालदीवपासून कर्नाटकच्या अंतर्गत भागापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
0 या हवामानबदलांमुळे महाराष्ट्रातील भूभागावर समुद्रावरून येणारे वारे बाष्प घेऊन येत आहेत.


आणखी दोन दिवस कमी दाबाच्या पट्टय़ाची शक्यता
अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. परिणामी मध्य भारतात घोंगावणार्‍या छोट्या वादळाची स्थितीदेखील कायम आहे. उत्तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात ही स्थिती आणखी दोन दिवस कायम राहू शकते. ए.एस.बारापात्रे, सहायक, हवामान तज्ज्ञ , आयएमडी, पुणे.