आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Rural Water Supply Department

ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी स्वतंत्र उपमुख्‍य अधिकारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या बळकटीकरणासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पदनिर्मिती करण्यात येणार आहे. शासनाच्या इतर विभागातून समकक्ष संवर्गातून प्रतिनियुक्तीने ही पदे भरली जाणार आहेत. राज्यभरात 33 पदे निर्माण केली जाणार आहेत.
जागतिक बॅँकेच्या अर्थसहाय्याने जलस्वराज्यचा दुसरा टप्पा शासनाने हाती घेतला आहे. यात नाशिक विभागात जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांचा समावेश केला आहे. यासाठी कंत्राटी पद्धतीने अनेक पदांची निर्मिती करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात निर्माण केलेली विविध पदे भरण्याची कार्यवाही होणार आहे. यापार्श्वभूमीवर ग्रामीण पाणीपुरवठा आणि निर्मल भारत अभियान, राष्ट्रीय पेयजल योजना आणि जलस्वराज्य टप्पा दोन अंतर्गत येणार्‍या योजनांच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे पद निर्माण करण्यात येणार आहे. याबाबतचे आदेशदेखील शासनाने पारित केले आहेत. प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे 33 जिल्ह्यांसाठी 33 पदनिर्मिती केली जाणार आहे. या योजनांचा कारभार ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून काढून घेतला जाणार आहे.


जिल्ह्यात चार अधिकारी
जलस्वराज्य टप्पा दोन अंतर्गत कार्यालयीन अधीक्षक, लेखाधिकारी, लिपिक ही पदेदेखील प्रतिनियुक्तीने भरली जाणार आहेत. तर अभियांत्रिकी तज्ज्ञ, सल्लागार, ग्रामलेखा समन्वयक हे पद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार आहे. जिल्ह्यात सध्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दर्जाचे तीन अधिकारी आहेत. यात आणखी एका अधिकार्‍याची भर पडणार आहे. स्वतंत्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदामुळे संपूर्ण यंत्रणा एकाच ठिकाणी येतील.

असा होईल फायदा
सध्या ग्रामीण पाणीपुरवठय़ा योजना आणि निर्मल भारत अभियानाची कामे ग्रामपंचायत आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत सुरू आहेत. अनेक योजना केवळ दोघा विभागांमधील समन्वयाअभावी रखडत आहेत. एकमेकांवर जबाबदार्‍या झटकण्यातून अनेक प्रo्न अनुत्तरीत राहताहेत, अशी सध्याची परिस्थिती आहे.

प्रतिनियुक्तीने भरणार पद
या पदावर ग्रामविकास विभागांतर्गत महाराष्ट्र विकाससेवा गट या संवर्गातील अधिकार्‍यांमधून हे पद प्रतिनियुक्तीने भरले जाणार आहे. यापदासाठी ‘अ’ वर्गातील गटविकास अधिकारी अथवा समकक्ष कार्यरत असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना त्या पदावर संधी मिळणार आहे. ग्रामविकास विभागाने अधिकारी उपलब्ध करून न दिल्यास शासनाच्या इतर विभागांतर्गत समकक्ष संवर्गातून पद भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.