आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jalgaon News In Marathi, Shiv Sena, Nationalist Congress Party, Divya Marathi

निवडणुकीचा आखाडा: खान्देश्‍ा विकास आघाडी, शिवसेनेला जवळ करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - सहा महिन्यांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत खान्देश विकास आघाडी, आमदार जैन आणि शिवसेना यांच्यावर मनसोक्त तोंडसुख घेणार्‍या भास्कर जाधवांना आता तिघांचाही कळवळा वाटतोय. लोकसभा निवडणुकीत या घटकांची मदत व्हावी यासाठी त्यांनी जैन यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली. निवडणूक प्रचारासाठी रविवारी शिवाजीनगरात राष्ट्रवादीच्या मेळावा झाला या वेळी प्रदेशाध्यक्ष जाधव बोलत होते.


जळगाव शहर विकासाच्या बाबतीत अनेक वर्षे मागे आहे आणि त्यासाठी खान्देश विकास आघाडीचे पदाधिकारी जबाबदार असल्याचे वक्तव्य भास्कर जाधव यांनी 29 ऑगस्ट रोजी पिंप्राळ्यात झालेल्या जाहीर सभेत व्यक्त केले होते. रविवारी झालेल्या मेळाव्यात मात्र त्यांनी राज्यात नाव घ्यावे अशा व्यक्तिमत्त्वाचा पाढा वाचताना आमदार जैन यांचेही नाव घेतले. त्यामुळे भाजपचा खासदार निवडून आला असताना भाजपने त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, शिवसेनेशी गद्दारी केल्याचे सांगत खाविआ आणि शिवसेनेची मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी केवळ भाजप आणि मोदी याच विषयावर त्यांनी टीकेची झोड उठविली. डॉ.सतीश पाटील यांनीदेखील आमदार जैन यांच्यासोबत मित्रपक्षाने दगाफाटा करून तुरुंगात डांबल्याचा उल्लेख केला. पालकमंत्री संजय सावकारे, जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, डॉ.सतीश पाटील, मनीष जैन, अरुण गुजराथी उपस्थित होते.


योग्य समन्वय आवश्यक
मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादीने काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकार्‍यांशी संपर्क ठेवला पाहिजे. केवळ जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षापुरते र्मयादित राहून चालणार नाही. पक्षाच्या पदाधिकार्‍यांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. अँड.संदीप पाटील, अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस


अद्याप निर्णय नाही
किशोर पाटील यांनी व्यक्त केलेले मत त्यांचे वैयक्तिक आहे. खाविआने संघटनात्मक पातळीवर अजून कोणत्या पक्षासोबत जायचे याचा निर्णय घेतलेला नाही. लवकरच भूमिका जाहीर करू. रमेश जैन, अध्यक्ष, खान्देश विकास आघाडी.


राष्ट्रवादीने मित्रपक्षाला डावलले
राष्ट्रवादीचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसच्या शहरातील पदाधिकार्‍यांना राष्ट्रवादीने मेळाव्याचे निमंत्रण दिले नाही. शहरातील मेळाव्याला वेळेवर महानगराध्यक्ष डॉ.अर्जुन भंगाळे यांना बोलावण्यात आले. त्यांच्याशिवाय काँग्रेसचा एकही पदाधिकारी मेळाव्याला नव्हता. राष्ट्रवादीकडून साधे निमंत्रणही नसल्याने काँग्रेस पदाधिकार्‍यांनी नाराज होते.

किशोर पाटलांकडून खाविआची वकिली
खाविआचे नगरसेवक किशोर पाटील यांनी खान्देश विकास आघाडी राष्ट्रवादीसोबत असल्याचे जाहीर केले. जाहीर भाषणात बोलताना त्यांनी शहरातून राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. भाजपा मदत करूनही विद्यमान खासदारांनी शहराकडे फिरूनही पाहिले नाही. शहरात त्यांना कोणी ओळखतदेखील नसल्याची जाहीर टीका त्यांनी केली.

दौर्‍याने उडाली पदाधिकार्‍यांची धांदल
मतदारसंघाचा दौरा आणि लग्न समारंभानिमित्त जळगाव दौर्‍यावर आलेल्या प्रदेशाध्यक्षांनी पक्ष पदाधिकार्‍यांची चांगलीच धांदल उडवली. वेळेपूर्वीच हेलिकॉप्टरने जळगावात दाखल होत त्यांनी थेट पक्ष कार्यालय गाठले. सर्व आघाडीच्या प्रमुखांना भाषणबाजीपासून रोखत निवडणुकीचे काय नियोजन केले त्याचे लेखी पुरावे मागितले.